देशातील सोयाबीनचे उत्पादन खाद्योपयोगासाठी उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न होत असले तरी सद्यस्थितीत सोयाबीनचा उपयोग तेलबिया म्हणूनच होत आहे. त्यामुळे सोयाबीनपासून तेल काढण्यासाठी आतापर्यंत १६० सोयातेल संयंत्रे सुरू झाली आहेत.
सोयाखाद्य तयार करण्यामध्ये इतर कार्यरत उद्योग व संस्था संख्येने तुलनात्मकदृष्ट्या जरी जास्त असली तरी देशातील ८५ टक्के सोयाबीन उत्पादनाचे प्रसंस्करण फक्त १६० सोया तेल उद्योगच करतात.
ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. अशास्थितीत सोयाबीनचा खाद्यपदार्थातील उपयोग वाढविण्यासाठी अधिक गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे जेणेकरून सोयाखाद्य उद्योगाचा अपेक्षित विकास होऊ शकेल.
सद्यः स्थितीत सोयाबीनचा उपयोग
■ सोयाबीनपासून तेल, प्रथिने व लेसिथिन हे घटक प्रामुख्याने मिळतात, भारतामध्ये सोयाबीन प्रक्रिया व त्याचा उपयोग या विषयावर जवळजवळ २६६ संस्था कार्य करीत आहेत.
■ सद्यस्थितीत देशात सोयाबीनवर प्रक्रिया करून १३५ लक्ष टन तेल व १५ लक्ष टन इतके अन्नपदार्थ तयार करण्याची क्षमता आहे.
■ गेल्या दोन दशकांपासून भारतात सोयाबीन हे तेल उत्पादनासाठी घेतले जाणारे तिसऱ्या क्रमांकाचे पीक आहे.
■ भारतीय सोयाबीन प्रक्रिया उद्योगांतर्गत अन्न, पशुखाद्य, औषधी इ. तयार होत आहेत सद्यःस्थितीत सोयाबीनचा उपयोग तेल काढण्यासाठी ८५ टक्के, बियाण्यासाठी १० टक्के व अन्न म्हणून ७ टक्के केला जातो
सोयाबीनपासून इतर अन्नपदार्थ
■ पूर्ण सोयाबीन तसेच तेलरहित किंवा अंशतः तेल काढलेले सोयाबीन यांचा उपयोग विविध पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो.
■ सोयाबीन सोयापीठ तयार करण्यासाठी सुद्धा वापरले जाते तसेच दुग्धजन्य उत्पादने जसे सोयादूध सोयापनीर, सोयादही, सोया आईस्क्रिम इत्यादीसाठीही त्याचा उपयोग करता येतो.
■ ह्याशिवाय सोयाबीनपासून बेकरी उत्पादने जसे केक, मफिन्स, बिस्किट, ब्रेड इत्यादी तयार करता येतात. सोयाबीनपासून मिळविलेले प्रथिनेसुद्धा अत्यंत उपयुक्त आहेत.
सोयापीठ
■ सोया पीठ तयार करताना सोयाबीनवर उष्णतेची प्रक्रिया करणे आवश्यक आहे या पीठापासून नंतर विविध पदार्थ तयार करता येतात. अथवा हे पीठ गहू किंवा ज्वारीच्या पिठासोबत मिसळून त्यापासून बनणाऱ्या पदार्थाचे पोषणमूल्य वाढविता येते.
■ सोयाबीनपासून बेकरी उत्पादने व लहान मुलांसाठी अन्नपदार्थः सोयाबीन पीठ ५ ते २५ टक्के या प्रमाणात इतर पदार्थामध्ये वापरून बेकरीचे विविध पदार्थ जसे ब्रेड, केक व कुकीज तयार करता येतात.
■ तसेच लहान मुलांसाठी अन्न तयार केले जाते तेव्हा हे पीठ इतर पदार्थासोबत वापरले जाते. त्या पदार्थातील प्रथिनांचे प्रमाणात वाढ होऊन त्याची पोषणमूल्य वाढतात.
सोया दूध व त्याचे इतर पदार्थ
■ चीनमध्ये सोया दुध हा पौष्टिक व स्वस्त पदार्थ म्हणून फार पूर्वीपासून प्रचलित आहे. याचे महत्वाचे गुणधर्म म्हणजे कमी किंमत, अधिक पोषकतत्वे व दुधातील लेक्टरोज हा घटक न पचणाऱ्यांसाठी योग्य पर्याय.
■ सोयादुधापासून विविध दुग्धजन्य पदार्थ केले जातात. उदा. पनीर, दही, श्रीखंड, आईस्क्रीम इत्यादी. सोयापनीर (टोफु) हा सोया दुधापासून तयार होणारा जगप्रसिद्ध पदार्थ आहे.
■ सोया पनीर हा दुधापासून बनविलेल्या पनीरला एक पर्याय होऊ शकतो. सोयादुधाला सायट्रिक आम्लाच्या सहाय्याने फाडून त्यातील पाणी (Whey) वेगळे काढले जाते व पनीर तयार केले जाते.
■ या पनीरची पोषक तत्त्वे दुधाच्या पनीरच्या बरोबरीनेच आहेत सोया पनीरमध्ये ७२ टक्के आर्द्रता, १३.८ टक्के प्रथिने व ८.८ टक्के स्निग्ध पदार्थ असतात, तर दुधाच्या पनीरमध्ये १४ टक्के प्रथिने व ९ टक्के स्निग्ध पदार्थ असतात.
■ याउलट सोयापनीरची किंमत ही दुधाच्या पनीरपेक्षा तिपटीने कमी आहे. तर दोन्ही पनीरचा साठवणूक कालावधी सारखाच आहे. सोयापनीरपासून भाजी, पनीर-पकोडा तसेच पनीर पराठा इत्यादी खाद्यपदार्थ तयार करता येतात
सोयाबीनपासून पारंपरिक भारतीय पदार्थ
■ सोयाबीनचा गहू, ज्वारी किंवा डाळीसोबत काही प्रमाणात वापर करून अनेक पारंपरिक भारतीय पदार्थ तयार केले जातात. उदा. पराठा, चकली, हलवा, पुरी, भाजी, शेव वगैरे. सोयापीठ इडलीच्या मिश्रणात थोड्या प्रमाणात वापरणे स्वीकारार्ह आहे.
■ सोयासत्तू हा एक शक्तिवर्धक व खाण्यासाठी केव्हाही तयार असा ग्रामीण भागात प्रचलित असणारा पदार्थ आहे.
■ डाळी व कडधान्याला भाजून हा पदार्थ तयार केला जातो डाळी व कडधान्य यासोबत काही प्रमाणात सोयाबीन वापरून सोयासत्तू तयार केले जाते.
■ साखर/गूळ किंवा मीठ आपल्या आवडीप्रमाणे सोयासत्तूमध्ये मिसळून तो खाण्यासाठी वापरला जातो.
■ लहान मुले व वयोवृद्ध व्यक्तींच्या आहारामधील पोषकतत्त्वांचे प्रमाण वाढविण्यासाठी हा एक अत्यंत उपयुक्त असा पदार्थ आहे.