दीपक दुपारगुडे
सोलापूर : वाढत्या विविध आजारांच्या पार्श्वभूमीवर आता नागरिकांकडूनसुद्धा आहाराबाबत विशेष काळजी घेतली जात आहे. रिफाइंड तेलावर रासायनिक प्रक्रिया केली जात असल्यामुळे नागरिकांनी लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय शोधला आहे.
घाण्याचा तेलासाठी पूर्वी तेल घाण्यावर जावे लागत होते. मात्र आता हेच तेल किराणा दुकानात मिळणार आहे. त्यामुळे विविध आजारांची चिंता मिटणार आहे.
कारण राज्यभरातील ८०० तेल उत्पादकांना एकत्र घेऊन बाजारात घाण्याचे तेल ब्रँड स्वरूपात उपलब्ध करून देणार असल्याचे लाकडी घाणा तेल उत्पादक संघ महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष ओंकार एकशिंगे यांनी सांगितले.
यांत्रिक पद्धतीने तेल काढताना तापमान ४०० ते ७०० अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. या वाढलेल्या उष्णतेमुळे अनेक पोषक घटक नष्ट होतात. मात्र कोल्ड प्रेस प्रक्रियेत ४० अंशांपेक्षा कमी तापमानात तेल काढले जाते. घाणा एका मिनिटात फक्त १४ वेळाच फिरतो.
त्यामुळे एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही. शुद्ध तेलामुळे वात दोष संतुलित राहतो. तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार होत नाहीत.
मधुमेह, उच्च रक्तदाब, सांधेदुखी, अर्धांगवायू यासारख्या गंभीर आजारांत लाकडी घाण्याचे तेल गुणकारी असल्याने घाण्याच्या तेलाचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
शरीराला किती तेल आवश्यक
■ शरीराला प्रोटीन मिळणे गरजेचे आहे.
■ नियमित व्यक्तीला १.१ किंवा १.२ ग्रॅम तर खेळाडूंना १.५ ते २ ग्रॅमपर्यंत प्रोटीन मिळायला हवे.
■ त्यातच शरीराच्या वजनानुसार ०.५ ते ०.७ ग्रॅम तेल शरीराला आवश्यक असते, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
असा आहे तेलाचा दर (रुपये प्रति लिटर)
शेंगदाणा : ३५०
तीळ : ५५०
करडई : ३५०
सूर्यफुल : ३५०
खोबरेल तेल : ५५०
सोलापूर शहर-जिल्ह्यात दहा ते बारा लाकडी घाणे असून, तेल घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. केवळ पारंपरिकच नव्हे तर बदाम, अक्रोड, जवस यासिन्हाव्यू प्रक्रिया करून हे तेल चेन्नई, हैदराबाद, दिल्ली, कर्नाटक, मुंबई आदी देशभरात पाठवले जाते. - प्रा. संजय हिरेमठ, लाकडी तेल घाणा व्यावसायिक
नागरिक आरोग्याच्या दृष्टीने सजग झाल्यामुळे नैसर्गिक घाणा तेलाच्या मागणीत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. लोकांची गरज ओळखून शेतकरी, घाणा तेल उत्पादक यांना एकत्र घेऊन तेल सहजासहजी उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - ओंकार एकशिंगे, अध्यक्ष-घाणा तेल उत्पादक संघ महाराष्ट्र राज्य
अधिक वाचा: Sorghum Jaggery गोड धाटाच्या ज्वारीपासून काकवी बनवण्याची सुधारित पद्धत