पुणे : शेतमालाला बाजारभाव नसल्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना आपला माल फेकून द्यावा लागतो. तर अनेकदा मातीमोल भावात शेतकऱ्यांना माल विक्री करावा लागतो. यावर उपाय म्हणून सोलर ड्रायर विकसित करण्यात आले आहे. यामध्ये भाजीपाला, फळे आणि इतर शेतमाल कटिंग करून सुकवता येतो. हा सुकवलेला भाजीपाला बऱ्याच दिवस टिकतो त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतो. सुकवलेल्या मालाला चांगला दर मिळत असल्यामुळे हे यंत्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. पुण्यातील मोशी येथे सुरू असलेल्या किसान प्रदर्शनामध्ये सोलर ड्रायर आपल्याला पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, मोशी येथे सुरू असलेल्या किसान कृषी प्रदर्शनामध्ये अनेक आधुनिक तंत्रज्ञान, यंत्रे, प्रयोग, प्रकल्प पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये आपल्याला सोलर ड्रायर सुद्धा पाहायला मिळणार आहे. हे यंत्र शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे असून ज्यावेळी शेतमालाला दर नसतात त्यावेळी शेतकरी माल सुकवून साठवून ठेवू शकतात. हा माल सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत टिकतो, त्याचबरोबर सुकवलेल्या मालासाठी जास्तीचा दर शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना यामुळे फायदा होऊ शकतो.
काय आहे सोलर ड्रायर?
सोलर ड्रायर हे उन्हावर चालणारे आणि पेटीसारखे दिसणारे एक यंत्र असून त्यामध्ये भाजीपाला कापून ठेवल्यास तो ठराविक वेळेत सुकतो. लाईटवर चालणारे यंत्रसुद्धा विकसित झाले आहेत.
सुकवलेला माल कुठे होतो विक्री?
सुकवलेल्या मालाला मोठी बाजारपेठ उपलब्ध असून हॉटेलमध्ये ग्रेव्ही बनवण्यासाठी सुकवलेला टोमॅटो आणि कांद्याचा वापर होतो. त्याचबरोबर ड्रायफ्रुट्स लहान मुलांच्या पोषणासाठी अधिक पौष्टिक असून सुकवलेल्या फळांचे स्लाईस थेट लहान मुलांना खाण्यासाठी आपण देऊ शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात सोलर ड्रायर हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे.
कोणता माल सुकवू शकतो?
यामध्ये कांदा, टोमॅटो, दोडका, कारले, पालेभाज्या, फळे आणि कोणताही भाजीपाला आपण सुकवून स्टोअर करून ठेवू शकतो. स्ट्रॉबेरी, चिकू, ड्रॅगन फ्रूट, पेरू अशी बरीच फळे सुकवता येतात. ओल्या पालेभाज्या आणि फळांपासून २० टक्के सुकवलेला माल तयार होतो. त्यामुळे या मालाला चांगला दर मिळतो. टिकवण क्षमता जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल जास्त दिवस ठेवता येतो.