पुणे : बदलत्या जीवनशैलीत प्लास्टिक आणि लाकडी वस्तूंना उत्तम पर्याय असलेल्या बांबूचे पर्यावरण पूरक विश्व शुक्रवारी पुणेकरांपुढे उलगडले. गणेश कला क्रीडा मंच येथे बंगळुरू येथील बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरतर्फे आयोजित 'पुणे बांबू फेस्टिव्हल २०२३'चे उद्घाटन शुक्रवारी भेट देण्यासाठी प्रथम येणाऱ्या पर्यावरणप्रेमी आणि बांबूप्रेमी व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले.
दि. २४ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हा फेस्टिव्हल सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. फेस्टिव्हलच्या उद्घाटन प्रसंगी बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे चेअरमन डॉ. हेमंत बेडेकर, तसेच बांबू अभ्यासक, मार्गदर्शक, संशोधक आणि कलाकार उपस्थित होते. पुणेकरांना पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करण्यासाठी या फेस्टिव्हलच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येत आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील भोर, वर्धा, कोकण, मराठवाडा अशा ठिकाणांहून बांबूच्या वस्तूंचे कारागीर सहभागी झाले आहेत.
या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेले बांबू, अभ्यासक, मार्गदर्शक, संशोधक आणि कलाकारांशी थेट संवाद साधण्याची संधी पुणेकरांना मिळते आहे. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनीसह मेळघाटातील स्वयंसेवी संस्था आणि महाराष्ट्रातील बचत गटांचा महत्त्वपूर्ण सहभाग हे यंदाच्या बांबू फेस्टिव्हलचे आकर्षण आहे.
३०० हून अधिक वस्तूंचा समावेश
या बांबू फेस्टिव्हलमध्ये बांबूपासून बनविण्यात येणाऱ्या विविध आकर्षक वस्तू आहेत. त्यामध्ये बांबूपासून बनवलेल्या तांदळासह बांबूचा टूथब्रश, बांबूची बाटली, सॉक्स, शर्ट्स, पुस्तके, लॅम्प्स, फर्निचर, बांबूच्या झोपड्या, घड्याळे, किचेन, तसेच नाजूक कलाकुसर असलेले बांबूचे दागिने अशा वैविध्यपूर्ण आणि कलात्मक ३०० हून अधिक वस्तूंचा समावेश आहे.