कीडनाशकांच्या वापरामुळे किटकांचा संहार प्रत्यक्ष दिसत असल्यामुळे पीक संरक्षणात मोठ्या प्रमाणात त्यांचा वापर केला जात आहे. परंतु कीडनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे बरेच विपरीत परिणाम होत असतात. त्यामुळे त्यांचे दुष्परिणाम दृष्टीआड करून चालणार नाही. सध्या जैविक पद्धतीने कीडनियंत्रण करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
जैविक कीडनियंत्रण म्हणजे कीटकांवर आढळणाऱ्या त्यांच्या नैसर्गिक शत्रूचा वापर करून नाश करणे, जैविक नियंत्रण परोपजीवी कीटक, अणुजीवाणू (बॅक्टेरिया), विषाणु, बुरशी या कीटकांच्या नैसर्गिक शत्रुमुळे करता येते. अशा नैसर्गिक शत्रुचा प्रथम शोध घेण्यात येतो, नंतर त्यांना प्रयोगशाळेत आणुन त्यांच्यावर निरनिराळ्या शास्त्रीय चाचण्या घेतल्या जातात, ते इतर परोपजीवी कीटकांचा संहार करीत नाहीत ना, तसेच ते मोठ्या प्रमाणात कमी खर्चात वाढू शकतात की नाही याचा सखोल अभ्यास केला जातो व तद्नंतर कीडनियंत्रणासाठी निसर्गात प्रसारित केले जाते.
जिवो जिवस्य जीवनम् या उक्तीप्रमाणे जैविक किड नियंत्रण ही अतिशय महत्त्वाची व पर्यावरण पुरक पद्धत आहे. नियंत्रणासाठी परोपजीवी आणि परभक्षी कीटक, बुरशी, विषाणु, सुक्ष्मजीवाणु, सुत्रकृमी, वनस्पतीजन्य किडनाशके अगर तत्सम घटकांपासुन तयार झालेल्या पदार्थांचा होणारा वापर म्हणजेच जैविक नियंत्रण होय. निसर्गातील मित्र किडींचे वर्गीकरण परोपजीवी किटक उदा. शत्रु किडीची अंडी / अळी / कोष / प्रौढ यावर उपजिविका करणारे व परभक्षी उपद्रवी किडींवर उपजिवीका करून त्यांचा नाश करणारे असे दोन प्रकार असतात. तसेच किडींना अपायकारक तथा रोग निर्माण करणारे सुक्ष्म रोगजंतुचा किडनाशक म्हणून समावेश होतो.
भारतात एकुण ३६१ अधिकृत जैविक किडनियंत्रण प्रयोगशाळा आहेत. महाराष्ट्रात जैविक किडनियंत्रणामध्ये अग्रेसर असलेल्या प्रयोगशाळेमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेचा समावेश आहे. सदरील प्रयोगशाळेमध्ये मेटा हीझीयम अॅनीसोपली १.१५% WP व्हर्टीसिलीयम लेकॅनी १.१५% WP बिव्हेरीया बॅसियाना १.१५% WP ट्रायकोडर्मा व्हीरीडी १% WP व स्युडोमोनास फ्लुरोसन्स ०.५% WP विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या जैविक किडनाशकांचा केंद्रीय किडनाशके मंडळ व नोंदणी समिती फरीदाबाद यांच्या शिफारशीत अंतर्भाव करण्यात आला आहे.
जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे विकसीत केलेले जैविक किडनाशके, त्यांचा उपयोग व मात्रा खालीलप्रमाणे आहेत.
दुध, सुर्यफुल तेल व स्टीकर यांचा वापर हा जैविक किडनाशकांची उपयुक्तता व प्रभावीपणा वाढवण्यासाठी करण्यात येतो.
वर नमूद केलेल्या जैविक घटकाशिवाय फुले न्युमोरिया न्यूमोरिया रिलोई) हि परोपजिवी बरुशी स्पोडोप्टेरा या पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी विद्यापीठातील संशोधनाच्या निष्कर्षावरून आढळुन आलेले आहे.
किडींना रोगकारक विषाणु हेलीओकिल ३% ओ. एस. (घाटे अळीचा विषाणू एच. ए. एन. पी. व्ही.) व मॅजीक ३% ओ.एस. (स्पोडोप्टेराचा विषाणू- एस. एल. एन. पी. व्ही.) यांचे देखील या प्रयोगशाळेत उत्पादन केले जाते. घाटे अळी स्पोडोप्टेरा या किडी बहुपीक भक्षी असल्यामुळे या पिकांवर या किडींचा प्रादुर्भाव आढळुन येईल. त्या पिकांवर सदर किडींच्या विषाणूची फवारणी, विद्यापीठातील संशोधनाच्या निष्कर्षास अनुसरून करण्यास हरकत नाही. परंतु या विषाणुची उपयुक्तता सध्या रजिस्ट्रेशन अभावी प्रात्यक्षिकांसाठीच मर्यादित आहे.
जैविक किडनाशके फवारताना घ्यावयाची काळजी१) जैविक किडनाशके फवारणीपुर्वी व नंतर १ आठवडा रासायनिक बुरशीनाशक वापरणे टाळावे.२) कोरड्या हवामानात पिकास भरपुर पाणी द्यावे.३) फवारणीनंतर चांगल्या नियंत्रणासाठी कोरड्या हवामानात २ दिवस तिसऱ्या प्रहरी फक्त पाणी फवारावे.४) जैविक किडनाशके थंड जागी साठवावेत.५) जैविक किडनाशक परोपजीवी बुरशीची फवारणी शक्यतो सायंकाळी ४ नंतर करावी.
निंबोळी पेंडीवर बुरशी वाढवणे जमिनीतील वेगवेगळ्या-किडीच्या नियंत्रणासाठी मेटॅऱ्हाझीयम ही परोपजीवी बुरशी, तसेच मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा परोपजीवी बुरशीची निंबोळी पेंड व शेणखतात मिश्रण करून त्यांची वाढ करून नंतर जमिनीत टाकल्यास अर्ध्या मात्रेमध्ये काम होते. त्यासाठी जमिनीत टाकल्यास अर्ध्या मात्रेमध्ये काम होते. त्यासाठी १०० कि. ग्रॅ. निंबोळी पेंड +४ कि.ग्रॅ. बुरशी ओलसर करून ५ दिवस ओलसर पोते किंवा प्लॅस्टीक कागदाने झाकूण ठेवावी व निंबोळी पेंडीवर वाढलेली बुरशी पुन्हा शेणखातवर वाढविण्यासाठी १ टन चांगले कुजलेले शेणखत+निंबोळीयुक्त बुरशी (वरील परोपजीवी बुरशीयुक्त निंबोळी पेंड) चांगले मिसळावे व ओलसर करून ४-५ दिवस झाकुन ठेवावे व नंतर जमिनीत मिसळावे.
डॉ. चिदानंद पाटील आणि डॉ. अजय हजारे किटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी०२४२६-२४३९११