Join us

बुरशी खाता येते का? कमी पाण्यात करता येणाऱ्या मशरूम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल

By मुक्ता सरदेशमुख | Published: August 25, 2023 4:00 PM

अनेकदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर मशरूमला 'बुरशी काय खायची!' किंवा 'कुत्र्याची छत्री' असा हिणवलेला सुर आता बदलू लागला आहे. आजकाल सर्रास ...

अनेकदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर मशरूमला 'बुरशी काय खायची!' किंवा 'कुत्र्याची छत्री' असा हिणवलेला सुर आता बदलू लागला आहे. आजकाल सर्रास मशरूमची भाजी खाल्ली जाते. विशेष म्हणजे, अगदी कमी पाण्यात लागवड करून भरपूर उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून युवा शेतकऱ्यांचा मशरूम लागवडीकडे कल वाढला आहे. 

अगदी छोट्याशा रूम किंवा गोडाऊनमध्येही करता येणाऱ्या या शेतीची जगभरातल्या बाजारपेठेत आणि हॉटेल व्यवसायिकांमध्ये मोठी मागणी आहे. मराठवाड्यासारख्या कमी पावसाच्या क्षेत्रातही तंत्रज्ञानाचा किंवा योग्य पद्धतींचा अवलंब करून मशरूम शेती करता येते. राज्य शासनाकडून मशरूम लागवडीला प्रोत्साहन दिले जात असून त्यासाठी अनुदानही मिळते.

आशिया आणि आफ्रिकेतील प्रदेशांमध्ये मशरूमची मागणी जास्त असून भारतात अलीकडेच उत्तर प्रदेश, हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर सारख्या थंड राज्यांमध्येही मशरूमची लागवड होत आहे.

मशरूम किती प्रकारचे? 

मशरूम हा खरंतर बुरशीचाच एक प्रकार. पण विषारी किंवा जंगली मशरूम आणि खाण्यायोग्य मशरूम यात मोठा फरक आहे. चिनी, कोरियन युरोपियन आणि जपानी पाक संस्कृतीत मशरूमचा मोठ्या प्रमाणात समावेश केला गेला आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर मशरूमची लागवड केली जाते. 

जगभरात मशरूमच्या सुमारे दहा हजार जाती असल्या तरी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून चांगल्या समजल्या जाणाऱ्या मशरूमच्या 5 जाती आहेत. बटन मशरूम, पॅडिस्ट्रॉ, स्पेशालिटी मशरूम, मेडिसिन मशरूम, धिंगरी किंवा ऑईस्टर अशी या जातींची नावे आहेत. बटन मशरूम हे लोक पसंतीस उतरलेले मशरूम असून याची लोकप्रियता वाढत आहे.

मशरूम लागवडीसाठी सरकार देते अनुदान

सध्या सरकार मशरूम लागवडीसाठी प्रोत्साहन देत असून भारतभर मशरूम पिकवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. मशरूम लागवडीसाठी कर्ज देण्याच्या योजनाही असून जिल्हा कृषी कार्यालयातून या संदर्भात तुमच्या व्यवसायाचा प्रस्ताव द्यावा लागतो.

लहान शेतकरी किंवा मशरूम फ्रुट बॅगवर 40% तर सामान्य व्यक्तीसाठी 20% पर्यंत अनुदान दिले जाते. प्रशिक्षित मशरूम लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. ज्याला राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेने मान्यता देण्याची गरज असते. 

मशरूम लागवड कुठे शक्य?

कमी तापमान असणाऱ्या कोणत्याही जागेत मशरूमची लागवड केली जाऊ शकते. मशरूम ला वाढवण्यासाठी गहू आणि भाताचा पेंढा आवश्यक आहे. त्याच्या संरक्षणासाठी कीटकनाशके तसेच बियाणे देखील खरेदी करावे लागतात. 

किती लागते गुंतवणूक?

मशरूम लागवड करण्यासाठी किंवा या शेतीसाठी लागणारी गुंतवणूक किती क्षेत्रात लागवड करावयाची आहे त्यावर अवलंबून आहे. लहान व्यवसाय असेल तर साधारण दहा हजार ते पन्नास हजारांपर्यंत गुंतवणूक गरजेचे असून मोठ्या व्यवसायासाठी एक ते दहा लाख रुपयांची गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते.

टॅग्स :शेती क्षेत्रव्यवसायशेतकरीपीकसरकारशेतीलागवड, मशागत