जागतिक किर्तीच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड कंपनीला प्लास्टीक उत्पादनांच्या विविध गटातून 2021-22 व 2022-23 अशा दोन वर्षांसाठीचे प्लेक्स कौन्सिलचे एकूण सहा निर्यात पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे उपस्थित होते.
यावेळी प्लेक्स कौन्सिलचे अध्यक्ष हेमंत मिनोचा, व्हॉईस चेअरमन विक्रम भदूरीया आणि उद्योजक एम ,पी तापडिया या मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा ग्रँड नेस्को सेंटर मुंबई येथे संपन्न झाला.
कृषी व कृषीपूरक उत्पादनांच्या क्षेत्रात जागतिक किर्तीची अग्रणी कंपनी जैन इरिगेशनने प्लास्टिक उत्पादनांच्या निर्यातीत उच्चांक राखत 2021-22 या वर्षासाठी जैन ठिबक सिंचन आणि पीव्हीसी फोमशीट या विभागांना पहिल्या क्रमांकाची पारितोषिके आणि फिटींग्ज् अॅण्ड होजेस विभागास दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
2022-23 या वर्षासाठी ठिबक सिंचन आणि पीव्हीसी फोमशीट या विभागांना पहिल्या क्रमांकाची पारितोषिके आणि फिटींग्ज् अॅण्ड होजेस विभागास दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस यांच्याहस्ते जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी डी. एम. बऱ्हाटे, डॉ. कल्याणी मोहरीर, अतिन त्यागी आणि नरेंद्र पाटील यांनी कंपनीच्यावतीने हे पुरस्कार स्वीकारले.
भारतात प्लास्टिक उद्योगाचा महत्त्वाचा वाटा आहे. या क्षेत्रात अजून प्रगती करायची असेल तर संशोधन आणि विकास कार्यावर भर देणे आवश्यक आहे. महाविद्यालय, युनिर्व्हसिटीमध्ये प्लास्टिक विषयक अभ्यासक्रम सुरू करणे उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
यावेळी प्रमुख मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले, प्लेक्स कौन्सिल ही भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग विभागाद्वारे 1955 मध्ये स्थापन केलेली संस्था आहे. भारतातील प्लास्टिकमधील वेगवेगळ्या क्षेत्रातील निर्यातीत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या उद्योगांना प्लेक्स कौन्सिल पुरस्कार देते. मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि.चा प्लास्टीक उत्पादनांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि निर्यातीबद्दल प्लेक्स कौन्सिलतर्फे 1991 पासून दरवर्षी सन्मान होत आला आहे.
कंपनीचे संस्थापक अध्यक्ष श्रध्देय भवरलाल जैन यांच्या दूरदृष्टीचा हा परिपाक होय, ते म्हणत असत की, "गुणवत्तेच्या जोरावरच आपण स्पर्धेला पात्र ठरू शकतो; किंबहुना स्पर्धकांना मागे टाकू शकतो. तसेच चोखंदळ ग्राहक व बाजारपेठ आपणास जागतिक कीर्ती मिळवून देऊन अग्रस्थानी बसवू शकते.” उत्तम, उदात्त, गुणवत्तेचा ध्यास घेत भविष्यात अनेक दर्जेदार वस्तु, शेतीत प्लास्टिकल्चर कशा वापरता येईल याकडे लक्ष दिले. जैन इरिगेशनच्या कार्याला अधोरेखित करून 1991 पासून ही पारितोषिके प्राप्त होत आहेत. कंपनीच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा, त्यांच्या कष्टाचा, समर्पण भावनेचा हा सन्मान असल्याचे मी मानतो."
- अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव