ड्रोन तंत्रज्ञानाने अलीकडच्या काळात कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली आहे. या तंत्रज्ञानामुळे कष्टात बचत झाली असून, संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्यास मदत होत आहे.
भविष्यात या तंत्रज्ञानाचा विस्तार अधिक वेगाने होणारा असून, कृषी क्षेत्राचे स्वरूपच बदलून जाणार आहे. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत ड्रोन तंत्रज्ञानाने भविष्य काय आहे याविषयीची सविस्तर माहिती.
अचूक कृषी निरीक्षण (Precision Agriculture)
• ड्रोनमध्ये बसवलेले मल्टीस्पेक्ट्रल किंवा थर्मल कॅमेरे पिकांच्या आरोग्याचे निरीक्षण करतील. हे कॅमेरे पिकांमध्ये असलेल्या तणावाचे लवकर निदान करतात, जे डोळ्यांना दिसण्याआधीच समजते. यामुळे पाणी, खत आणि कीटकनाशकांचा अपव्यय कमी होतो आणि अचूक वापर करता येतो.
• ड्रोनच्या मदतीने शेतातील मातीची आरोग्य स्थिती, आर्द्रता पातळी, आणि भूभागाचे सखोल विश्लेषण करता येते. यामुळे अचूक पेरणी, खत आणि सिंचनाची प्रभावी आखणी करता येते ज्यामुळे संसाधनांचा योग्य वापर होतो.
पेरणी आणि बियाणे (Planting and Seeding)
भविष्यात काही ड्रोन विशेषतः बियाणे पेरणीसाठी डिझाइन केलेले असतील. हे ड्रोन बियाणे समान अंतरावर आणि योग्य खोलीवर बियाणे पेरतील. ज्यामुळे उगवण क्षमता प्रभावी होऊन श्रमिक खर्च कमी होईल.
फवारणी (Spraying)
ड्रोनच्या मदतीने अचूकपणे खत, कीटकनाशक आणि तणनाशके फवारता येतात. ही पद्धत केवळ अधिक कार्यक्षम नाही तर पर्यावरणावरही कमी परिणाम करणारी आहे.
पशुप्राण्यांचे निरीक्षण (Livestock Monitoring)
ड्रोनच्या मदतीने कुराणात चरणाऱ्या पशुप्राण्यांचे निरीक्षण करणे सोपे होईल. तसेच आरोग्याचे निरीक्षणही करता येते.
डेटा संकलन आणि विश्लेषण (Data Collection and Analysis)
ड्रोन रिअल-टाइममध्ये डेटा गोळा करतात. या डेटाचा विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने करून पिक व्यवस्थापन, रोग निदान, आणि उत्पादन वाढविण्याबाबत निर्णय घेता येतात.
ड्रोन तंत्रज्ञानाचे भविष्य
• स्वयंचलित शेती (Autonomous Farming)
ड्रोन अधिक स्वयंचलित होण्याची अपेक्षा आहे. हे ड्रोन स्वतःच मार्ग शोधून पेरणीपासून ते कापणीपर्यंत सर्व कामे करु शकतील परिणामी मानवी हस्तक्षेपाची गरज कमी होईल.
• स्वॉर्म ऑपरेशन्स (Swarm Operations)
भविष्यात ड्रोनचे थवे दिसून येतील. ज्यामुळे एकत्र काम करून देखील प्रत्येक ड्रोन वेगवेगळ्या कार्यांमध्ये विशेष असेल जसे की पेरणी, फवारणी, आणि निरीक्षण, ज्यामुळे मोठ्या क्षेत्रावर कार्यक्षमतेने काम करता येईल.
• हवामान अनुकूलन (Climate Adaptation)
हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रात विविध आव्हाने निर्माण झाली आहेत. ड्रोन हवामानाचे निरीक्षण करून पाण्याचा वापर अनुकूल करणे आणि हवामानास अनुकूल पिकांची निवड करण्यात मदत करतील.
• शाश्वत कृषी (Sustainable Agriculture)
अचूक फवारणी आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर केल्यामुळे पर्यावरणावर कमी परिणाम होतो. तसेच, ड्रोनच्या मदतीने पुनर्नवीनीकरण कृषी पद्धतींना मदत मिळेल, जसे की मातीतील कार्बन साठवणूक वाढविणे.
• इतर तंत्रज्ञानांसोबत एकत्रिकरण (Integration with Other Technologies)
ड्रोन IoT, स्मार्ट फार्मिंग आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानासोबत एकत्रित होतील, ज्यामुळे कृषी उत्पादनाचे ट्रेसिबिलिटी, डेटा सुरक्षा, आणि कार्यक्षमता वाढेल.
डॉ. दिपक बोरणारे
उपसंचालक व विभागप्रमुख
(कृषी अभियांत्रिकी विभाग, एम आय टी, छत्रपती संभाजीनगर).
हेही वाचा : शेतकऱ्यांचे कष्ट होणार कमी; कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीला ठरणार वरदान