- रविंद्र शिऊरकर
पुणे : पुणे येथील किसान प्रदर्शनात नवनवीन प्रयोग बघायला मिळत आहेत. त्यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान, यंत्रे यांचे प्रात्यक्षिके तसेच शेती उत्पादने पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळत आहे. या प्रदर्शनात शेतीचे काम करणारे एक यंत्र असून त्याला 'इलेक्ट्रिक बैल' म्हणून ओळखले जाते. ज्याद्वारे शेतीतील बियाणे पेरणे, खुरपणी, मातीची भरणी, किटकनाशकांची फवारणी इत्यादी कामे केली जाऊ शकतात.
दरम्यान, बैलाच्या मार्फत शेतातील जी कामे केली जातात ती सर्व कामे या यंत्राद्वारे केली जात आहेत. हे यंत्र चार्जिंग करून काम करत असल्यामुळे शेतकऱ्यांना चारा आणि पाणी टंचाईत चारा विकत घेण्याची गरज नाही. देखभाल खर्च अल्प प्रमाणात आणि एकाच यंत्रामध्ये वेगवेगळी कामे होत असल्यामुळे हे यंत्र फायद्याचे ठरत आहे. या यंत्रासाठी कोणत्याही प्रकारच्या इंधनाची गरज लागत नाही. हे यंत्र चार्जिंगवर चालत असल्यामुळे शेतकऱ्यांना यासाठी जास्त खर्च येत नाही.
मजुरांची कमतरता दिवसेंदिवस वाढत आहे. शेतात वेळेवर मजूर येत नाहीत, पैसे अधिकचे मागतात, जास्तीचे काम करत नाही अशावेळी हा इलेक्ट्रिक बैल शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारा आहे. ज्याच्या माध्यमातून पेरणी, पिकांना माती लावणे, आंतरमशागत, फवारणी आदी कामे केली जातात. कमी वेळात चार्जिंग करून याद्वारे शेतकरी अल्प वेळात व अल्प खर्चात आपल्या शेतीची कामे करू शकतात.
किसान शेतकरी प्रदर्शनात यंत्र पाहण्याची संधी
पुण्यातील मोशी येथील किसान शेतकरी प्रदर्शनामध्ये हे यंत्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. या प्रदर्शनाचा उद्या शेवटचा दिवस असून राज्यभरातून आणि देशभरातून अनेक शेतकरी येथे भेटी देत आहेत. जगभरातील नवे तंत्रज्ञान पाहण्याची संधी शेतकऱ्यांना या प्रदर्शनात मिळत आहे.