Pune : राज्यातील गाळप हंगाम येणाऱ्या एका महिन्यांत सुरू होत आहे. मंत्री समितीच्या बैठकीमध्ये १५ नोव्हेंबर रोजी गाळप हंगाम सुरू करण्यासंदर्भात एकमत झाले असून त्याआधी सुरू होणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेशही साखर आयुक्तांकडून देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे ध्येय ठेवल्यामुळे आता साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर दिला आहे. पण मागच्या दोन वर्षाचा विचार केला तर इथेनॉल निर्मितीचा वेग मंदावल्याचं साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
केंद्र सरकारने मागच्या गाळप हंगामात उसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादन कमी होण्याच्या अंदाजामुळे इथेनॉल निर्मितीवर बंधने आणली होती. यामुळे कारखान्यांना मिळणाऱ्या अधिकच्या नफ्यावर कुऱ्हाड पडली होती. पण काही दिवसांत पुन्हा इथेनॉल निर्मितीवरील बंधने शिथील करण्यात आली. पण राज्यात २०२२-२३ च्या गाळप हंगामापेक्षा २०२३-२४ च्या गाळप हंगामामध्ये इथेनॉलचे उत्पादन घटले आहे.
किती झाले इथेनॉलचे उत्पादन?राज्यात २०२२-२३ च्या गाळप हंगामात १३२ कोटी लीटर इथेनॉलचा कोटा ऑईल कंपन्यांकडून मंजूर करण्यात आला होता. तर त्यापैकी १०३ कोटी ८९ लाख इथेनॉलचा पुरवठा राज्यातील कारखान्यांकडून करण्यात आला. पण त्यानंतरच्या म्हणजेच २०२३-२४ च्या गाळप हंगामात ८९ कोटी ९२ लाख लीटरचा कोटा असून ऑगस्ट २०२४ अखेर केवळ ७३ कोटी लीटर इथेनॉलचे उत्पादन झाले आहे. चालू इथेनॉल पुरवठा वर्षामध्ये (म्हणजे ३१ ऑक्टोबरपर्यंत) जरी ८३ कोटी लीटरपर्यंतचा आकडा गाठला तरीही मागील दोन पुरवठा वर्षामध्ये २० कोटी लीटरची तफावत आहे. मागील गाळप हंगामातील केवळ दोन महिन्यामध्ये जास्त इथेनॉलचे उत्पादन झाले होते. त्यामध्ये डिसेंबर २०२३ आणि जानेवारी २०२४ या महिन्यांचा सामावेश आहे. डिसेंबर २०२३ मध्ये १२ कोटी ३० लाख लीटर तर जानेवारीमध्ये १२ कोटी ४१ लाख लीटर इथेनॉलचे उत्पादन झाले होते. पण त्यानंतरच्या सर्वच महिन्यात ८ कोटी लीटरपेक्षा कमी इथेनॉल उत्पादन झाले आहे. २०२३-२४ च्या गाळप हंगामात ३१ ऑक्टोबरपर्यंत ८५ कोटी लीटर इथेनॉल उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.
यंदाच्या ऊस हंगामात ३,२५० रुपये पहिली उचल मिळण्याची शक्यता वाचा सविस्तर