कृषी यांत्रिकीकरणामध्ये मळणी यंत्र हे एक प्रमुख यंत्र आहे. मळणी यंत्र खरेदी करत असाल तर त्याची रचना माहित असणे आवश्यक आहे तसेच त्याचा वापर कसा करावा. मळणी यंत्र हे वर्षभर वा सतत चालणारे यंत्र नाही ते सुगी पुरतेच चालते त्यामुळे त्याची निगा व देखभाल कशी राखावी याविषयी आपण माहिती पाहणार आहोत.
मळणी यंत्राची रचना
मळणी यंत्रामध्ये ड्रम, सिलेंडर, चाळणी आणि पंखा यांचा समावेश असतो.
- ड्रम: मळणी यंत्रातील ड्रम बर्हिगोल असतो. या ड्रममध्येच शेंगा, कणीस, अवेष्टयांचे दाणे वेगळे केले जातात.
- सिलेंडर: ड्रमच्या आतील भागात सिलेंडर बसविलेला असतो. दाणे वेगळे करण्यासाठी त्यावर वेगवेगळया प्रकारचे दाते बसविलेले असतात.
- चाळणी: वेगवेगळया पिकानुसार (दाण्याच्या आकारानुसार) वापरल्या जातात.
- पंखा: पंखा हा चाळणीखाली बसविलेला असतो. यांच्या सहाय्याने दाण्यापासून भुसा वेगळा केला जातो व भुसा जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरला जातो.
मळणी यंत्राची कार्यपध्दती
मळणी यंत्रातील सिलेंडर आणि पंखा एकाच वेळी ट्रॅक्टर, इंजिन, पावर टिलर किंवा इलेक्ट्रीक मोटारच्या शक्तीचा वापर करुन फिरवले जातात. कणसे किंवा ओंब्या जेव्हा वेगाने फिरणाऱ्या सिलेंडर आणि स्थिर ड्रममध्ये येतात तेव्हा घर्षणामुळे दाणे वेगळे होतात व चाळणी पडतात आणि पंख्याच्या सहाय्याने भुसा वेगळा केला जातो. महत्त्वाचे म्हणजे स्थिर ड्रम व सिलेंडर यांच्यातील अंतर पिकानुसार अॅडजस्ट करावे, त्यामुळे कार्यक्षमता वाढते.
मळणी यंत्राच्या कार्यपध्दतीचे तंत्र व देखभाल
मळणी ड्रमची गती कशी निवडावी:
मळणी ड्रमची गती वाढविल्यास लागणारी उर्जा व दाणे तुटण्याचे प्रमाण कमी होते, परंतु एकूण धान्याचा अपव्यय वाढतो. यात स्वच्छ धान्य, मळणी झालेले धान्य तसेच मळणी न करता वाया गेलेले धान्य तसेच मळणी न करता वाया गेलेले धान्य याचा समावेश होतो. याउलट ड्रमची गती कमी केल्यास मळणीयंत्राची क्षमता, धान्य स्वच्छ करण्याची क्षमता कमी होते व धान्य वाया जाण्याचे प्रमाण वाढते. ब्युरो ऑफ इंडिय स्टॅण्डर्ड (BIS) ने प्रमाणीत केल्यानुसार मळणी यंत्राद्वांरे होणारे एकूण धान्य तोटा हा ५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा, तसेच दाणे फुटण्याचे प्रमाण २ टक्क्यापेक्षा कमी असावे.
अ. क्र | पिकाचे नाव | ड्रमची गती (मि/सेकंद) |
१ | सोयाबीन | ८-१० |
२ | बाजरी | १५-२० |
३ | ज्वारी | १५-२० |
४ | मका | ९-१२ |
५ | गव्हू | २०-२५ |
६ | भात | १५-२० |
मळणी ड्रम व जाळीतील फट:
फिरणारा सिलेंडर व ड्रम यांमधील अंतर सामान्यत: १२-३० मिमी इतके असावे. हे अंतर कमी असल्यास धान्याबरोबर त्याचे काडी मळले जाते त्यामुळे अधिक प्रमाणात ऊर्जा लागते.
ब्लोअर/पंखा/अॅस्पिरेटर अॅडजस्टमेंट:
निर्मात्याच्या शिफारशीनुसार गती निश्चीत करावी. ही गती कमी जास्त करण्यासाठी फॅन पुली किंवा ड्राइव्ह पुली कमी जास्त व्यासाची वापरावी. फॅनची गती जास्त झाल्यास भुश्याबरोबर धान्यही फेकले जाऊ शकते किंवा कमी झाल्यास धान्यात भुसा मिसळला जातो.
चाळणीची ठेवण:
मळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीची साईज, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ्या यंत्राची गती आणि जाळी हलवण्याचे अंतर या गोष्टींवर अवलंबून असते. सामन्यत: चाळणीचा उतार २ ते ६ अंश असावा तसेच चाळणी हलविणाऱ्या यंत्राचा वेग ३०० ते ४०० फेरे/मिनिट असावा आणि चाळणी हलण्याचे अंतर १५ ते २५ सेमी दरम्यान असावे.
मळणी यंत्र चालवितांना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय
अ. क्र | अडचणी | उपाय |
१ | दाणे व्यवस्थित वेगळे न होणे | अ. सिलेंडर स्पीड वाढवावे. |
२ | दाणे तुटण्याचे प्रमाण वाढणे | अ. जास्त प्रमाणात फिडींग करु नये. |
३ | धान्य/दाणे भुश्याबरोबर उडणे | अ. पंख्याची गती कमी करणे. |
४ | धान्य/दाणे यात भुसा येणे | अ. पंख्याची गती वाढवावी. |
५ | वरच्या चाळणीवर दाण्याचे प्रमाण वाढणे | अ. चाळणीचे छिद्र बंद झाले असल्यास ते साफ करावे. |
६ | मळणी ड्रम जाम होणे | अ. जास्त प्रमाणातील फिडींग टाळावी. |
इंजी. वैभव सूर्यवंशी
विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव
९७३०६९६५५४