Join us

सौर उर्जेतुन वीज निर्मिती सोबत पिकांची लागवड शक्‍य.. आलं हे नवीन तंत्रज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 14:11 IST

जर्मन एजन्सी जीआय झेड, सन सीड प्रायव्हेट लिमिटेड आणि वनामकृवि यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने ॲग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञान विकास व संशोधना करिता परभणी जिल्ह्यामध्ये मानवत जवळ ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे.

जर्मन एजन्सी जीआय झेड, सन सीड प्रायव्हेट लिमिटेड आणि वनामकृवि यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने ॲग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञान विकास व संशोधना करिता परभणी जिल्ह्यामध्ये मानवत जवळ ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या संशोधन प्रकल्पाचे उद्घाटन दिनांक ११ मार्च रोजी करण्यात आला.

अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जीआयझेडच्या इंडो जर्मन एनर्जी फोरमचे संचालक श्री. टोबीयास वीन्टर, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्‍या माजी मुख्य शास्त्रज्ञा डॉ. रेणु खन्ना चोप्रा, नॅशनल सोलार एनर्जी, फेडरेशन ऑफ इंडियाचे श्री. मोनू बिश्नोई हे होते. याप्रसंगी संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, संचालक संशोधन डॉ. जगदीश जहागीरदार, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, कुलसचिव श्री. पी के काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्‍हणाले की, ॲग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन शेतजमिनीवर सौर ऊर्जा निर्मिती आणि पिक लागवड हे दोन्‍ही बाबी शक्‍य होणार आहे. हे तंत्रज्ञान जर्मनी, जपान, इटली या प्रगत देशात प्रचलित होत आहे.

भारतात मोठया प्रमाणात सौर ऊर्जा निर्मितीस वाव असुन संशोधनाच्‍या माध्‍यमातुन कोणते पीक ॲग्रीपीव्‍ही तंत्रज्ञानात किफायतीशीर राहील, हा मुळ उद्देश जीआयझेड आणि परभणी कृषी विद्यापीठ संयुक्‍त संशोधन प्रकल्‍पाचा आहे. ॲग्रीपीव्‍ही हे पर्यावरण पुरक तंत्रज्ञान असुन यात शेतजमीनीचा कार्यक्षम वापर करून हरित ऊर्जा निर्मिती शक्‍य होणार आहे.  

प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभामध्ये जीआयझेड या संस्थेद्वारे मोठी गुंतवणूक करून उभारण्यात आलेले संशोधन साहित्य व उपकरणे विद्यापीठास कराराद्वारे कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यात आले. यामुळे विद्यापीठाद्वारे ॲग्री-फोटोव्होल्टेईक हा प्रकल्प कायमस्वरूपी कार्यान्वित ठेवण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

मार्गदर्शनात जीआयझेडचे संचालक टोबियास वीन्टर यांनी ॲग्रीपीव्‍ही तंत्रज्ञान संशोधनात पुढाकार घेतल्‍या बाबत विद्यापीठाचे अभिनंदन करून म्‍हणाले की, भारतात जर्मनीपेक्षा अडीच पट जास्‍त सौर ऊर्जा उपलब्ध असुन याचा लाभ ॲग्रीपीव्‍ही तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन शेतकरी बांधवा होऊ शकतो.

आज पर्यंत केवळ २ टक्के सौर प्रकल्प उभारले असून ९८ टक्के बाकी आहेत. हे सर्व प्रकल्प उभारण्यासाठी दरवर्षी ३०,००० हजार हेक्टर जमिनीची आवश्यकता असून भारत सरकारने हे लक्ष तिप्पट म्हणजे ९०,००० हेक्टरचे निर्धारित केलेले आहे, म्हणून भारताकडे जगातील इतर देशांचे लक्ष ॲग्री-फोटोव्होल्टेईक प्रकल्पासाठी लागल्याचे विशद केले.

नॅशनल सोलर एनर्जी, फेडरेशन ऑफ इंडियाचे श्री. मोनू बिश्नोई यांनी ॲग्री-फोटोव्होल्टेईक प्रकल्पातील गुंतवणूक आणि कार्य नमूद केले तसेच आयएआरआयच्‍या माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. रेणु खन्ना चोप्रा यांनी जागतिक तापमान वाढीमुळे उद्भवणाऱ्या उष्णता आणि दुष्काळाचा परिणाममध्ये ताण सहन करणारे संशोधन शास्त्रज्ञाने विकसित करावेत, यासाठी ॲग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा असे सांगितले.

उद्घाटन समारंभास सन सीड प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक विवेक सराफ हे आभासी माध्यमाद्वारे सहभागी झाले होते. प्रास्ताविकात प्रकल्पाच्या मुख्य शास्त्रज्ञा डॉ. गोदावरी पवार यांनी हा प्रकल्प विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असल्याचे स्पष्ट करून प्रकल्पाअंतर्गत सुरुवातीस झेंडू, टरबूज, खरबूज यासारखी पिके सोलर पॅनल खाली घेतली होती आणि सध्या तूर, सोयाबीन, हळद, केळीसारखे पिके घेऊन त्यावर संशोधन करण्यात येत आहे असे नमूद केले.

विद्यापीठातील पदव्‍युत्‍तर पदवीचे विद्यार्थ्यां अग्रीपीव्‍ही तंत्रज्ञानावर संशोधन करत असल्‍याचे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. सुनीता पवार यांनी केले तर आभार डॉ. राहुल रामटेके यांनी मानले.

कार्यक्रमाचे नियोजन संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ‌. गोदावरी पवार, उपमुख्य शास्त्रज्ञ डॉ. राहुल रामटेके, डॉ. आर. व्ही. चव्हाण, डॉ. विक्रम घोळवे, डॉ. बसलींगप्पा कलालबंडी, डॉ. सुदाम शिराळे, डॉ. सुनिता पवार आणि डॉ विशाल इंगळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी जीआय झेडचे फ्लोरियन पोस्टल, एलिना टेट्जलफ, तात्जेना आणि विद्यापीठातील विविध महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :शेतीपीकशेतकरीमराठवाडावसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठजर्मनी