Join us

ॲग्री बिजनेस : बांबूपासून बनवा शेळीपालन शेडनेट, कांदाचाळ

By गोकुळ पवार | Published: November 25, 2023 10:36 PM

कांदा चाळ, शेळीपालन करण्यासाठी बांबूचा उपयोग करत शेडनेट उभारण्यात येत आहेत.

हल्ली सगळीकडे बांबूची उत्पादने पाहायला मिळतात. घर सजावटीसाठी, हॉटेलसाठी त्याचबरोबर आता शेतीसाठी सुद्धा बांबूची उत्पादने फायदेशीर ठरत आहेत. यात कांदा चाळ, शेळीपालन करण्यासाठी बांबूचा उपयोग करत शेडनेट उभारण्यात येत आहेत. बांबूवर प्रक्रिया करून स्ट्रक्चर उभारण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना अनेक वर्षे कांदा चाळ आणि शेळी पालनासाठी हे फायदेशीर ठरणार आहे. 

नाशिकच्या अजित टक्के यांनी बांबूपासून कांदा चाळ आणि शेळीपालन करण्यासाठी हे बांबू शेडनेट स्ट्रक्चर उभे केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना विविध उपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या आहेत. यात कांदा चाळीचा माल साठवणुकीसाठी सुद्धा उपयोग होऊ शकतो. तसेच छोटीशी नर्सरी सुद्धा यात उभी करू शकतो. तसेच टेरेस गार्डन, गांडूळ खताच्या प्लॅन्टसाठी बांबू शेडनेट महत्वाचं ठरू शकतं. 

बांबूपासूनची कांदा चाळ

शेतकऱ्यांसाठी कांद्याची साठवणूक खूप महत्त्वाचा विषय असतो. योग्य भाव आल्यानंतर शेतकरी चाळीतील कांदा विक्रीसाठी काढत असतात. त्यामुळे हा साठवलेला कांदा सुरक्षित असणे आवश्यक असते. यासाठी कांदा चाळ मजबूत आणि टिकाऊ असणे आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर बांबूपासून कांदा चाळ देखील महत्वपूर्ण ठरत आहे. अनेकदा पावसापासून कांदा चाळीचे मोठे नुकसान होते, चाळीतील कांदा सडण्याची भीती असते. अशावेळी शेतकरी विशेष काळजी घेत असतात. त्यामुळे बांबूपासूनची कांदा चाळ नवीन पर्याय उभा आहे. 10 बाय 12 च्या मॉड्युलरमध्ये 3 ते साडे तीन टन कांदा साठवला जाऊ शकतो. या मॉड्युलरच्या पुढे देखील चाळ उभारली जाऊ शकते. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार चाळ बनविता येणार आहे. एकदा स्ट्रक्चर उभे केल्यास 15 वर्षापर्यंत अडचण राहणार नाही, अशी माहिती अजित टक्के यांनी दिली.

एकाच छताखाली शेळी पालन, मत्स्यपालन

तसेच बांबूपासून मत्स्यपालन आणि शेळीपालन करता येणार आहे. बांबू शेडनेट स्ट्रक्चरच्या माध्यमातून एकाचवेळी शेळी पालन आणि मत्स्यपालन करू शकतो. जमिनीवरून चार फुटावर उभारलेले शेळी फार्म आणि त्याच खाली मत्स्यपालन देखील करता येऊ शकते. यासाठी साधारण चार फूट वर शेळ्यांसाठी अस्तर बनवू शकतो. जेणेकरून स्वछता ठेवण्यास मदत होईल. त्याचबरोबर शेळ्यांची विष्ठा थेट खाली माशांच्या टाकीत जाइल, जेणेकरून माशांना खाद्य स्वरूपात ते मिळू शकेल. अशापद्धतीने एका जागेत एकाचवेळी शेळीपालन आणि मत्स्य पालन केले जाऊ शकते, अस बांबू पासून विविध उत्पादने घेत असलेले अजित टक्के यांनी सांगितले.

टॅग्स :शेळीपालननाशिककांदाबांबू गार्डन