- नरेंद्र गुरव
Nandurbar : असं म्हणतात, 'केल्याने होत आहे, रे आधी केले पाहिजे' कोणतीही गोष्टी करायला आत्मविश्वास बळकट असला पाहिजे. आणि याच जिवंत उदाहरण म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील कमलेश अशोक चौधरी. या तरुण शेतकऱ्याने 55 फुट लांबीचा हायड्रॉलिक बूम स्प्रे (Hydraulic Boom Spray) तयार केला आहे. केवळ दोन महिन्यात हा बूम स्प्रे तयार केला असून या स्प्रेने वीस मिनिटात दहा एकरला कीटकनाशक, तणनाशकची फवारणी करता येते.
कमलेश चौधरी (Kamlesh Chaudhari Nandurbar) यांचे शिक्षण कृषी पदवीपर्यंत झाले आहे. नोकरी नसल्याने ते घरीच शेती करतात. गावाबाहेर वैजाली रोडवर एका गोडाऊनमध्ये सर्व टाकाऊ वस्तूचा संग्रह करून ठेवलेला आहे. दरवर्षीं ते सोशल साईटचा आधार घेऊन नवीन शेती अवजार बनवत असतात. टाकाऊपासून टिकाऊ तयार करण्याची त्यांना आवड आहे. अनुभवातून ते हे सर्व तयार करत स्वतः रोजगार उपलब्ध करतात. गेल्या वर्षी 27 फूट लांब बूम स्प्रे मॅन्युअली तयार केला होता. यावर्षी चक्क हायड्रोलिक बूम स्प्रे तोही 55 फूट लांब असा तयार केला आहे.
नेमका प्रयोग कसा केला?
कमलेश यांनी सुरवातीला साडे तीन लाख रुपयांत जुन्या ट्रॅक्टरची खरेदी केली. त्यासाठी पंजाब येथुन एक लाख 75 हजारचे बुस्टनचे एअरलेस टायर मागवले. मागील दोन टायर सहा फूट उंचीचे तर पुढील दोन टायर साडे चार फूट उंचीचे आहेत. त्यानंतर एक हजार लिटरची टाकी बसवली, यासाठी 45 हजार रुपये खर्च आला. ही टाकी ट्रॅक्टरच्या मधोमध बसवली आहे. जेणेकरून ट्रॅक्टर पुढून उचलले जाऊ नये. टाकीतील औषधी फवारणीसाठी स्पीड पंप बसवला आहे. जो एका मिनिटाला 185 लिटर पाण्याच्या प्रेशर करतो. कीटकनाशक फवारणी करताना अंगावर येऊ नये, म्हणून काचेची एसी केबिन सुद्धा बनवली आहे.
मशीनचे फायदे काय?
या मशीन मुळे 55 फूट लांबीवर बूम स्प्रे केला जातो.
दहा एकरला फक्त वीस ते पंचवीस मिनिटात फवारणी होते.
फवारणी करताना समप्रमाणात फवारणी केली जाते.
वेळ, पैशांची बचत
ट्रॅक्टरचे पॉवर स्टेरिंग असल्याने शेतामध्ये सहज कुठे फिरू शकते.
एक हजार लिटरची टाकी जोडण्यात आली आहे.
दरवर्षीं नवीन प्रयोगातून अधिक शेतीला प्रोत्साहन
दरवर्षी अशा पद्धतीने काहींना काही शेती उपयुक्त अवजारे तयार करत असून यंदा 55 फुट लांबीचा हायड्रोलिक बूम स्प्रे तयार केला आहे. घराच्या आजूबाजूला असलेले टाकाऊ साहित्य आणि काही शेतीच्या अवजारापासून बूम स्प्रे तयार केला. यासाठी सुरवातीला डिसाईन तयार करून ते वेल्डिंग करून त्यावर रंगकाम शेवटी जोडणी केली. शेती आधुनिक पद्धतीने करता यावी यासाठी दरवर्षीं वेगवगेळे प्रयोग करत असल्याचे ते म्हणाले.