Nashik : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते. त्यात इगतपुरीतील घोटी ही भात, तांदळाची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. यंदा येथील इंद्रायणी भाताला उच्चांकी दर मिळत असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्याचबरोबर भाताच्या वाणाला यंदा चांगला दर मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
महाराष्ट्रातील तांदूळ उत्पादन इतर राज्याच्या तुलनेत उकृष्ट प्रतीची निर्मिती करत आला आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील तांदळाने आपला नावलौकिक उत्पादकता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कायमच अग्रक्रम राखला आहे. केंद्र सरकारने बासमती व गैर बासमती तांदळाच्या निर्यातीवर नुकतीच काही टक्के वाढ झाल्याने काही देशात निर्यात बंद झाल्याचे चित्र पुढे आले आहे. इगतपुरी तालुक्यात मात्र उत्पादित होणाऱ्या तांदळाची निर्यात होत नसून, इंद्रायणी, 1008, एमपी 125, वाडा कोलम, जय श्रीराम या वाणाचे उत्पादन इतर राज्याच्या तुलनेत अल्प प्रमाणात असल्याने त्याचा पुरवठा व मागणी महाराष्ट्रातच आहे. अर्थातच निर्यातीवर नाशिक जिल्ह्यातील भात उद्योगावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नसल्याचे चित्र आहे.
भारतातून जगभरात प्रमाणात बासमती व गैर बासमती मोठ्या तांदळाची निर्यात होत असते. त्यात पंजाब, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, इगतपुरी तालुक्यात भाताचे उत्पादन यावर्षी उत्तम प्रतीचे झाले आहे. शेतातून मार्केटमध्ये प्रसिद्ध इंद्रायणी जातीच्या भाताने उच्चांकी आकडा गाठला असून, प्रतिक्विंटलप्रमाणे इंद्रायणी भात 3200, 1008 भाताला 2800, एमपी 2700, वाडा कोलम 2700, जय श्रीराम २८०० रुपये खरेदीचा भाव मिळाला आहे. महाराष्ट्रात इतर ठिकाणाहून इंद्रायणीची मागणी वाढली असल्याने उच्चांकी भाव मिळाला असल्याचे निदर्शनास येत आहे. कच्च्या मालाला एवढा भाव मिळत असल्याने अर्थात पुढील काळात तांदळाच्या भावात मोठी वाढ होण्याची दाट शक्यता राईस उद्योग क्षेत्रात वर्तविली जात आहे
यंदा भाताला वाढीव दर
केंद्र सरकारने निर्देशित केलेल्या कच्च्या भाताच्या खरेदीवर हमी भावापेक्षा 700 ते 1 हजार रुपयांनी यावर्षी वाढीव भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. दरवर्षीच्या तुलनेत बघता या वर्षी मालाचा दर्जा व उत्तम भाव मिळत असल्याने भात खरेदी - विक्रीत नवचैतन्य निर्माण झाले आहे. यावर राईस अॅड भगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष संजय चोरडिया म्हणाले की, इगतपुरीचा भात उत्तम प्रतीचा असल्याने महाराष्ट्रात मागणी असते. येथील तांदळाची इतर देशात निर्यात होत नसल्याने राईस इंडस्ट्रीजवर कुठलाही परिणाम होणार नाही. यावर्षी उत्तम प्रतीचे उत्पादन झाल्याने मागणी वाढत असून, इंद्रायणीने उच्चांक गाठला आहे.