Join us

दूध व्यवसाय परवडेना; पशुपालकांचा शेळीपालनाकडे वाढला कल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 3:36 PM

शहरी भागांत मांसाहाराची मागणी अधिक 

- रविंद्र शिऊरकर 

गरिबांची गाय तसेच शेतकऱ्याचं चालतं बोलतं एटीएम म्हणून शेळीकडे बघितलं जातं. शेवरी, लिंब, बोरं यांची एक छोटी फांदी किंवा शेतातील मूठ भर गवताची वैरण म्हणजे शेळीचं दिवसभराचं अन्न. घरी पाहुणे आले की, कप भर दूध काढायचं आणि चहा करायचा तर कधी घरातील मुलांना दुधभाकर खाण्यासाठी दुधाचा वापर करायचा यासाठी शेतकरी घरघुती एक दोन शेळ्यांचे पालन करतात. याव्यतिरिक्त दवाखाना किंवा तत्सम आर्थिक स्थिती निर्माण झाली की बोकडं किंवा शेळी विक्रीस काढायची आणि त्यातून निर्माण झालेली आर्थिक गरज भागवायची. या सर्वांत शेळी व बोकडांची बऱ्यापैकी हातोहात जागेवर विक्री होत असल्याने शेळीपालन शेतकऱ्यांना सोयीचे आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून दुधाचे दर कमी झाले असून सोबत लाखभर रुपये खर्चून घेतलेल्या गाई खर्चाच्या तुलनेत उत्पन्न देत नसल्याने आता पशुपालक शेळीपालनाकडे मोठ्या प्रमाणात वळाले आहे. शेळीपालनात कष्ट कमी लागतात सोबत शेळ्यांचे आरोग्य व्यवस्थापन कमी खर्चिक असल्याने तसेच कमी चारा पाणी संगोपनात लागत असल्याने शेळीपालनाकडे पशुपालक शेतकरी सरसावत आहे. दिवसेंदिवस मांसाहार कडे मोठ्या प्रमाणात वळणारी तरुणाई तसेच शहरात बोकडांची वाढलेली मागणी यातून शेळीपालन अधिकाधिक विस्तारत आहे.

मागणी वाढली मात्र बोकडांची संख्या मात्र अल्प१५-२० किलोचे बोकडं तयार व्हायला साधारण दोन तीन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे बऱ्याचदा मागणीच्या तुलनेत पुरवठा न झाल्याने बाजारांत तेजी निर्माण होते. मी गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध भागांतून बोकडांची खरेदी करून चाकण बाजारात विक्री करतो. या ठिकाणी सतत बाहेर राज्यातील बोकडं देखील विक्रीला येतात. शेळीपालनात मागणी असल्याने शेतकऱ्यांनी शेळी पालनाकडे वळायला हवे. - इमरान घोडके, व्यापारी 

अल्प चारा व उत्पन्न हमी चारा क्षेत्र कमी असेल व अल्प कष्टात भरभक्कम हमी हवी असेल तर शेळीपालन एक उत्तम पर्याय आहे. काटेकोर लक्षपूर्वक व्यवस्थापन असेल तर शेळीपालनातून वार्षिक एक रक्कमी चांगला परतावा मिळतो. तसेच सध्या शेळ्यांना व  बोकडांना मागणी देखील अधिक असल्याने शेतकऱ्यांना शेळीपालन एक उत्तम आणि चांगला जोडधंदा पर्याय आहे. - योगेश शेवाळे, शेळीपालक बोरसर ता. वैजापूर जि. छ. संभाजीनगर

टॅग्स :शेती क्षेत्र