Join us

Sugarcane Factory : गाळप घटले पण वर्षाअखेर किती होणार साखरेचे उत्पादन? कारखान्यांकडे किती राहिली थकबाकी?

By दत्ता लवांडे | Published: February 12, 2024 10:06 PM

जाणून घ्या यंदा किती साखरेचे होणार उत्पादन

पुणे : यंदा कमी पावसामुळे उसाचे उत्पादन कमी झाले आहे. तर राज्यातील चार साखर कारखान्यांनी आपलं गाळप थांबवलं आहे. आत्तापर्यंत ७५१ लाख टन उसाचे उत्पादन झाले आहे तर त्यातून ७३३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. अजून एक ते दीड महिना उसाचा हंगाम सुरू राहण्याची शक्यता आहे. तर अनेक ठिकाणच्या कारखान्यांना उसाच्या अनुपलब्धतेमुळे एका महिन्याच्या आत गाळप थांबवावे लागणार आहे. 

सरकारने राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. तर त्याबरोबरच अनेक तालुक्यांत दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. सद्यस्थितीत राज्यातील अनेक धरणांची पाणीपातळी २० टक्क्यांहून कमी आहे. येणाऱ्या पूर्ण उन्हाळ्यात पाणीटंचाईचे भीषण संकट महाराष्ट्रावर असणार आहे. तर पावसाळ्यात पाऊस कमी पडल्यामुळे उसाचे उत्पादन कमी होऊन गाळपही कमी झाले होते. 

मागच्या वर्षीच्या गाळप हंगामात या वेळेस ८२८.२८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप आणि ८११ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. त्यातुलनेने यंदा ७७ लाख टन उसाचे गाळप आणि ७८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन कमी झाले आहे.  तरीही नोव्हेंबर अखेरच्या अतिवृष्टीमुळे हे उत्पादन वाढले आहे, अन्यथा अजूनही कमी उसाचे गाळप झाले असते असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

राज्यात किती होणार साखरेचे उत्पादन?राज्यात ८ फेब्रुवारीअखेर ७५१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून ७३३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर येणाऱ्या काळात अजून दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन हे ९२५ लाख क्विंटल ते ९५० लाख क्विंटलच्या आसपास असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दिवाळीनंतर पडलेल्या अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागातील आणि पाणी कमी पडलेल्या उसाला फायदा झाला असून त्यामुळे उसाच्या उत्पादनातही काही प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र आहे. 

८ फेब्रुवारीपर्यंतचे उसाचे गाळप

  • एकूण उसाचे गाळप - ७५१.७६ लाख मेट्रिक टन
  • एकूण साखरेचे उत्पादन - ७३३.११ लाख क्विंटल
  • गाळप बंद झालेले कारखाने - ४

३१ जानेवारी अखेरपर्यंतची राज्यभरातील आकडेवारी

  • उसाचे  गाळप - ५७०.११ लाख मेट्रिक टन
  • टोटल ग्रॉस एफआरपी देय (वाहतूक आणि तोडणी खर्चासहित) - १७ हजार ६३३ कोटी रूपये
  • टोटल ग्रॉस एफआरपी देय (वाहतूक आणि तोडणी खर्च सोडून) - १३ हजार २५९ कोटी रूपये
  • टोटल एफआरपी वाटप (तोडणी, वाहतूक खर्चासहित) - १७ हजार १५५ कोटी रूपये
  • टोटल एफआरपी वाटप (तोडणी, वाहतूक खर्च सोडून) - १२ हजार ७८१ कोटी रूपये
  • वाटप झालेली एफआरपी (तोडणी, वाहतूक खर्चासहित) - ९७.२९ टक्के
  • वाटप झालेली एफआरपी (तोडणी, वाहतूक खर्च सोडून) - ९६.३९ टक्के
  • एकूण एफआरपी थकबाकी - ४७८ कोटी रूपये
  • Actual FRP वाटप (तोडणी, वाहतूक खर्चासहित) - १६ हजार १२६ कोटी रूपये
  • Actual FRP थकबाकी  - १ हजार ५०७ कोटी रूपये
  • Actual FRP वाटप - ९१.४५ टक्के
  • १०० टक्के एफआरपीची रक्कम देणारे कारखाने - ९४ टक्के
  • एवढ्या कारखान्यांकडे एफआरपीची देणे बाकी - ११२
  • RRC (महसूल वसुली प्रमाणपत्र) जारी झालेले कारखाने - १
टॅग्स :शेती क्षेत्रसाखर कारखानेऊस