ज्या ज्या शेतकऱ्याकडे जनावरे आहेत, त्यांच्यापुढे चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा पाऊस अत्यल्प असल्याने चारा कमी आहे. उपलब्ध चाऱ्याचे नुकसान होऊ नये म्हणून समृद्धी मुरघास बॅग शेतकऱ्यांना महत्वाची ठरणार आहे. साधारण पन्नास किलोपासून ते 5 टनांपर्यंत चारा साठवता येणार आहे. त्यामुळे आगीपासून इतर गोष्टीपासून चाऱ्याचा बचाव देखील करता येणार आहे. नेमकी ही मुरघास बॅग काय आहे, हे समजून घेऊया.
यंदा राज्यभरात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. पाऊस कमी झाल्याने चारा पाणी आदींची कमतरता भासू लागली आहे. अनेक भागात नोव्हेंबरमध्येच पाणी टंचाई, चारा टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे आतापासूनच जनावरांना चारा -पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जो उपलब्ध चारा आहे, त्याची साठवणूक करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यावर उपाय म्हणून सोलापूर जिल्ह्यातील युवा शेतकऱ्याने पर्याय उभा केला आहे. समृद्धी मुरघास बॅगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षभर चारा साठवून ठेवता येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला युवा शेतकरी गंगाप्रसाद पाटील यांनी समृद्धी मुरघास बॅग शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. आज प्रत्येक शेतकऱ्याकडे जनावरे आहेत, मात्र यंदाच्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती मुळे चाऱ्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आहे त्या चाऱ्यात पुढील वर्षभर गुजराण करावी लागते, मात्र मुरघास बॅगमुळे 50 किलोपासून ते 5 टनांपर्यंत चारा साठवून ठेवता येऊ शकतो. त्यामुळे आग लागण्यापासून, पावसापासून बॅगेत साठवून ठेवलेल्या चाऱ्याचा बचाव होतो. आणि जनावरांना हवा तसा, हवा तेव्हा चारा उपलब्ध करून देता येतो.
समृद्धी मुरघास बॅग कशी आहे?
व्हर्जिन प्लॅस्टिक पासून बनवलेली ही बॅग आहे. साधारण 50 किलोपासून ते 5 टनांपर्यंत बॅग उपलब्ध आहेत. यात 50 किलोची बॅग 50 रुपये, 125 किलोची बॅग 175 रुपये, 800 किलोची बॅग 500 रुपये, 1 टनची बॅग 800 रुपये, 2.5 ते 3 टन बॅग 1350 रुपये, 4.5 ते 5 टनची बॅग 2000 रुपयांपर्यंत खरेदी करता येते. योग्य प्रमाणात अल्ट्राव्हायलेट (UV) केमिकलचा वापर यामुळे बॅगचे तुकडे होत नाहीत. वरचा थर खराब होत नाही. बॅग गोलाकार असल्याने माल जास्त भरतो. बॅग पांढऱ्या रंगामध्ये असल्यामुळे उष्णता शोषत नाही, त्यामुळे चारा गरम होत नाही व गार चारा जनावरांना मिळतो.
मुरघास म्हणजे काय?
मुरघास म्हणजे जनावरांचा पूर्ण चार, खाण्यास योग्य ठेवणारी एकमेव साठवण पद्धत म्हणजे मुरघास होय. या पद्धतीत हवा विरहित अवस्थेमध्ये जगणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंमुळे हिरव्या वैरणीत असलेल्या साखरेपासून लॅक्टीक आम्ल तयार होते. हे आम्ल चारा चांगल्या अवस्थेत ठेवण्याचे काम करते. हिरवा चार कापून जेव्हा खड्ड्यात / बॅगेत भरला जातो, तेव्हा वनस्पतींच्या पेशी जिवंत असतात व त्यांचा श्वासोच्छवास चालू असतो. त्यामुळे पाणी व कार्बन डायऑक्साईड तयार होतो. तसेच चारा दाबून भरल्यामुळे खूप उष्णताही निर्माण होते व खड्ड्यातील हवा ही निघून जाते. त्यामुळे हवेतील जगणारे जीवाणू तेथे तग धरू शकत नसल्याने चारा खराब न होता टिकून राहतो.