Maharashtra Sugar Industry : राज्यात लवकरच यंदाचा साखर गाळप हंगाम सुरू होणार आहेत. मंत्री समितीची बैठक झाल्यानंतर गाळप हंगामाच्या शुभारंभाची तारीख निश्चित केली जाणार आहे. पण यंदा मान्सूनचा पाऊस चांगला बरसल्याने कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी सुखावले आहेत. हे असले तरी या गाळप हंगामासाठी उपलब्ध उसाचे क्षेत्र हे मागच्या वर्षीच्या तुलनेत २ लाख हेक्टरने कमी झाले आहे.
दरम्यान, मागच्या वर्षीचा म्हणजेच २०२३-२४ चा गाळप हंगाम १ नोव्हेंबर रोजी सुरू झाला होता तर सर्वांत उशिरा म्हणजे १५ मे पर्यंत साखर कारखाने सुरू होते. मागच्या वर्षी मान्सूनच्या पावसाने राज्यात पाठ फिरवली होती. राज्यातील ४० तालुक्यांत आणि अनेक मंडळांत दुष्काळ जाहीर होऊनही नोव्हेंबर अखेर झालेल्या अवकाळी पावसाने उसाचे उत्पादन वाढले होते. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे १० कोटी ७६ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले होते. त्यातून ११० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.
पण यंदा उसाखालील क्षेत्र जवळपास २ लाख हेक्टरने कमी झाले असून यंदाच्या गाळप हंगामासाठी केवळ ११ लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्र उपलब्ध असणार आहे. पण मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचा पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र कमी होऊनही साखरेचे उत्पादन हे १०० लाख टनापेक्षा जास्त होणार असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.
२०२३-२४ मधील गाळप हंगामातील अनेक साखर कारखान्यांनी १५ दिवसांत शेतकऱ्यांचे पेमेंट केले नसल्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता. साखर आयुक्तालयाने ६ साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई केली होती. त्यातील ६ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पेमेंट दिले असून अद्यापही ५ साखर कारखान्यांकडे ३५ कोटींपेक्षा जास्त एफआरपीची रक्कम बाकी आहे.
उसाखालील क्षेत्र घटले
यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत उसाचे क्षेत्र २ लाख हेक्टरने घटले आहे. मागच्या वर्षी म्हणजे २०२२-२३ च्या गाळप हंगामासाठी राज्यात १४ लाख ३७ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र उपलब्ध होते. यंदा त्यामध्ये घट होऊन ११ लाख ६७ हजार हेक्टर (नजरअंदाजित) क्षेत्र उपलब्ध होणार आहे. येणाऱ्या गाळप हंगामात उपलब्ध असणाऱ्या उसाच्या क्षेत्रामध्ये घट झाली असली तरी कृषी विभागाच्या माहितीनुसार यंदा २ लाख हेक्टरवर नवीन आडसाली उसाची लागवड होणार आहे.
यंदा किती मिळणार एफआरपी?
केंद्र सरकारने लोकसभेच्या निवडणुकांच्या आधी उसाच्या एफआरपीमध्ये २५० रूपये प्रतिटनाची वाढ केली होती. मागच्या हंगामात प्रतिटन ३ हजार १५० रूपये एफआरपी जाहीर केला होता. पण यंदाच्या म्हणजेच २०२४-२५ च्या गाळप हंगामात शेतकऱ्यांना प्रतिटन ३ हजार ४०० रूपये मिळणार आहेत. एफआरपी रक्कमेतून तोडणी, वाहतूक खर्च वजा करून शेतकऱ्यांना रक्कम दिली जाते. पण यंदा केंद्र सरकारने चांगले धोरणे राबवले तर साखर कारखाने शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा चांगला दर देऊ शकतात असंही काही कारखानदारांनी लोकमत अॅग्रोशी बोलताना सांगितले आहे.
५ वर्षांपासून साखरेच्या 'एमएसपी'मध्ये वाढ नाही
केंद्र सरकारने २०१८ पासून साखरेच्या एमएसपी मध्ये (किमान आधारभूत किंमत) वाढ केलेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढेलेले नसल्यामुळे साखर कारखान्यांना त्याचा तोटा होत आहे. उसाच्या एफआरपीमध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांना फायदा होतोय पण साखरेच्या एमएसपीमध्येही वाढ व्हावी अशी मागणी राज्यातील कारखानदार करत आहेत.
कोणत्या कारखान्यांकडे पैसे थकीत
१) मातोश्री लक्ष्मी शुगर कोजनरेशन इंड.लि., रूद्देवाडी, ता. अक्कलकोट, जि.सोलापूर - १४ कोटी ५५ लाख
२) विठ्ठ्ल रिफाईंड शुगर्स लि, पांडे, ता, करमाळा - ४ कोटी २५ लाख
३) श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखाना - ६३ लाख
४) कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील सहकारी साखर कारखाना लि. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा - ९ कोटी ८४ लाख
५) जयहिंद शुगर प्रा. लि. आचेगाव, ता. दक्षिण सोलापूर - ७ कोटी ८७ लाख
यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत २ लाख हेक्टरने उसाचे क्षेत्र घटलं आहे. पण सोलापूर, मराठवाडा विदर्भात आणि एकूणच महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे उसाचे टनेज वाढेल. त्यामुळे यावर्षीसुद्धा १०० लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. इथेनॉलला परवानगी दिल्यामुळे साखर उद्योगाला चांगली संधी मिळाली आहे. साखरेचे वाढीव उत्पादन इथेनॉलकडे जाणार आहे. केंद्र सरकारने साखरेचा एमएसपी (किमान आधारभूत किंमत) २०१९ पासून वाढवलेला नाही. सरकारने साखरेचा एमएसपी वाढवावा ही विस्मातर्फे आम्ही मागणी करत आहोत.
- बी. बी. ठोंबरे (अध्यक्ष, WISMA)