तजमुल पटेलकोळवण : 'गरज ही शोधाची जननी असते' या म्हणीप्रमाणे कामाला सुरुवात करीत, वेल्डिंगचा मजुरी खर्च वाचविण्यासाठी स्वतःच वेल्डिंगचे काम केले.
कोळवण येथील पंढरीनाथ रामदास दुडे या युवकाने वेल्डिंग कामाचा कोणतेही अनुभव, प्रशिक्षण नसताना येणाऱ्या अडचणींवर माहिती घेत मात केली.
मजुरांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी भंगारातील व टाकाऊ साहित्याचा वापर करीत टाकाऊ साहित्यातून टिकाऊ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त भातझोडणी यंत्राची निर्मिती केली आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात गावाकडून शहराकडे लोकांचे स्थलांतर झाले आहे. शेतीची कामे करण्यासाठी मनुष्यबळ मिळणे कठीण झाले आहे. मिळाल्यास तर मजुरी जास्त असल्याने उत्पादन खर्चात वाढ होते. परिणामी शेतकरीवर्ग हैराण झाला आहे.
त्यामुळे येथील तरुणाने हे देशी जुगाड शोधले आहे. या यंत्रामुळे वेळेची आणि पैशाची बचत होते. पाच ते सहा माणसाचे काम दोन माणसेदेखील अगदी निम्म्या वेळेत करू शकतात. असे भात झोडणी मशीन या युवकाने बनविले आहे.
जुने लोखंडी पाईप, अँगल, पत्रा व मोटर वापरत व काही नवीन वस्तू वापरून हे यंत्र तयार करण्यात आले आहे. त्याला अंदाजे १५ ते २० हजार रुपये खर्च आला आहे. कोळवण खोरे हे भाताचे आगार म्हणून ओळखले जाते.
या यंत्रामुळे तेथील स्थानिक, तसेच मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या यंत्राची माहिती घेण्यासाठी अनेक शेतकरी पंढरीनाथ दुडे यांच्याकडे येत आहेत.
भात झोडणी सुलभ व्हावी, यासाठी बाजारात १८ हजारांपासून विविध कंपन्यांचे भात झोडणी यंत्र विकत मिळते. वर्षातून एकदाच भात पीक घेतले असल्यामुळे ते यंत्र पुढे आठ महिने पडून राहते. त्यासाठी त्यांनी भंगारातील टाकाऊ पत्रा, शेटरच्या पट्या, पंप, बेल्ट व बेरिंग एकत्र करून मशीन बनविले.
असा होतो यंत्राचा वापर■ या यंत्राने एका मिनिटात एक व्यक्ती सहा भाताच्या पेंढ्या झोडू शकतात.■ या यंत्रावर एका वेळी चार व्यक्ती एकत्र काम करू शकतात.■ ६० मिनिटांत चार व्यक्ती मिळून १४४० पेंढ्या झोडू शकतात.■ काम करताना हातांना त्रास कमी, कष्ट कमी, वेळ कमी, ब्लोअर मशीन वापरली तर उपणनी पुन्हा करावी लागत नाही.■ पेंढा शेतकऱ्यांना पूर्णपणे वापरता येतो.