खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खतांची आवश्यकता असते. उत्पादन वाढवण्यासाठी अनेकदा शेतकरी पिकांना रासायनिक खते देतात. परिणामी,पिकांवर त्याचा परिणाम होतो. जमिनीच्या सुपिकतेवर परिणाम होऊन जमिनीचा पोत बिघडतो. जमीन नापीक होत जाते. असे होऊ नये यासाठी जैविक खते वापरण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जातो.
औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकऱ्यांसाठी द्रवरूप जैविक खाते उपलब्ध केली आहेत. व ती कशी वापरावीत याच्या मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत.
जमिनीतील जीवजंतू व प्राणी हे जमिनीची सुपीकता वाढवत असतात. जमिनीतील जैविक घटकांचा वापर करून जिवाणू खत निर्मिती होते. द्रवरूपातील जिवाणू खते ही अशाच जिवंत किंवा सुप्त अवस्थेतील जिवाणूंचे मिश्रण असते. ज्यामुळे जमिनीचा आरोग्य व उत्पादनक्षमतेत वाढ होते.
जैविक द्रवरूप खतांचा शेतकऱ्यांना काय फायदा?
• द्रवरूप असल्यामुळे शेतकऱ्यांना वापरण्यास व हाताळण्यास सोपी• व्हेंचुरी व खताच्या टाकीद्वारे ठिबक सिंचनातून अगदी सहजरीत्या पिकास देता येते.• जमिनीत अस्तित्वात असलेल्या मूळच्या जिवाणू सोबत कार्य करण्याची क्षमता अधिक• जिवाणूंची संख्या 12 ते 24 महिन्यांपर्यंत सतत स्थिर राखली जाते
जैविक द्रवरूप खते का वापरावीत?
• जैविक खतामुळे जमिनीची सुपीकता वाढून पोत सुधारतो, जमीन जैविक क्रियाशील बनते व उत्पादनक्षमतेत वाढ होते.• आर्थिक दृष्ट्या व पर्यावरणाचे संतुलन राखण्यास फायदेशीर• मुळांच्या संख्येत व लांबीमध्ये भरपूर वाढ झाल्यामुळे जमिनीत मुख्य खोडापासून दूरवर व खोलवर असणाऱ्या अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होतात• जमिनीची नैसर्गिक सुपीकता टिकवून ठेवता येते.• रासायनिक खतावरील नत्र व स्फुरद शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा 25% खतांची बचत होते.• पिकाची रोग व कीड प्रतिकारशक्ती वाढते व पीक संरक्षण खर्चाची बचत होते.• जिवाणू खतातील जिवाणू पिकाच्या वाढीसाठी आवश्यक पदार्थांची निर्मिती करतात उदाहरणार्थ जिब्रेलीन, जीवनसत्व बी-१२, बायोटिन, इंडोल असेटिक ऍसिड इत्यादीमुळे बियाणांच्या उगवणीवर व वाढीवर चांगला परिणाम होऊन उत्पादन वाढीस मदत होते.• दुबार पिकासाठी उपयुक्त नत्र साठा शिल्लक राहतो.
ही बुरशीनाशके कशी वापरावीत?
सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी त्यानंतर जिवाणू खतांची बीजप्रक्रिया करून द्रवरूप जिवाणू खतांचा वापर करावा. भाजीपाला, भात इत्यादी रोपांच्या मुळावर पुनर्लागवड करताना ऍझोटोबॅक्टर, ऍझोस्पिरिलम व स्फुरद विरघळणाऱ्या द्रवरूप जीवाणूंचा वापर केला जातो. 100 मिलि द्रवरूप जिवाणू खताची मात्रा 25 ते 30 लिटर पाण्यात मिसळून रोपांच्या मुळांना लागवड करण्याअगोदर अर्धा तास त्यामध्ये बुडवून ठेवावे. व नंतर मातीत मिसळावे. ठिबक सिंचनाद्वारे ऊस,केळी,कापूस, अद्रक व हळद इत्यादी पिकांना द्यावे.
एक एकरासाठी प्रत्येकी 100 मिलि जिवाणू खते 200 लिटर पाण्यात मिसळून फवायाच्या सहाय्याने रोपाच्या मुळाजवळ सकाळी किंवा संध्याकाळी फवारावीत. जिवाणू खते गर्मीच्या ठिकाणी किंवा थेट सूर्यप्रकाशात ठेवू नयेत. ज्या पिकांसाठी शिफारस असेल त्याच पिकांसाठी जिवाणू खते वापरावीत. जिवाणू खते दिल्यानंतर त्यांना जिवंत ठेवण्यासाठी ओलावा आवश्यक आहे.