खरीप आणि लेट खरीप हंगामातील कांदा लागवडीसाठी दर्जेदार आणि किफायतशीर असलेल्या ‘फुले समर्थ’ आणि रब्बीसाठी उपयुक्त असलेल्या फुले बसवंत या वाणाच्या कांदा बियाणांसाठी शेतकऱ्यांनी मागील २१ मेपासून महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात गर्दी केली आहे. अवघ्या तीन दिवसांत ११० क्विंटल बियाणे विक्री झाले असून अजूनही ४० क्विंटल शिल्लक असल्याचे विद्यापीठाच्या बियाणे विभागाने सांगितले आहे.
अवघ्या तीन दिवसांत १ कोटी ३५ लाख रुपयांचे बियाणे विकले गेले असून शेतकऱ्यांसाठी शनिवार व रविवार या साप्ताहिक सुटीच्या दिवशीही कांदा बियाणे विक्री सुरू असणार आहे. सध्या १५०० रुपये प्रति किलो या दराने हे बियाणे विक्री होत आहे. एक एकर कांदा लागवडीसाठी सुमारे तीन किलो बियाणांची आवश्यकता पडते असे येथील शास्त्रज्ञांनी सांगितले. बाजारात खासगी कंपन्यांच्या कांदा बियाणे अडीच ते तीन हजार रुपये प्रति किलो दराप्रमाणे मिळते. त्यामुळे स्वस्त व दर्जेदार असणाऱ्या फुले समर्थकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतो.
यंदा लागवड वाढणार?मागच्या वर्षी पाऊस उशिरा पडल्याने शेतकऱ्यांनी कांदा बियाणांची कमी खरेदी केली होती. मात्र यंदा चांगल्या पावसाचे संकेत आहेत. तसेच आगामी काळात कांद्याचे बाजारभाव वाढू शकतात असा शेतकऱ्यांना अंदाज आल्याने ते कांदा बियाणे खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहे. दुसरीकडे विद्यापीठानेही यंदा कांदा बियाणांचे उत्पन्न वाढविले असून विद्यापीठाच्या प्रक्षेत्राबरोबरच, निफाड, पिंपळगाव, लखमापूर अशा विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावरही कांदा बियाणांची पैदास करण्यात आली आहे.
यासंदर्भात विभागीय संशोधन केंद्र, निफाड येथील शास्त्रज्ञ डॉ. योगेश पाटील यांनी माहिती दिली, की यंदा त्यांनी दोन दिवसात जवळपास पावणेदोन हजार किलो कांदा बियाणे विक्री केले आहे. तर कुंदेवाडी, निफाड येथील संशोधन केंद्रावरही फुले समर्थ वाणाचा एक प्लॉट घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक शेतकरी विद्यापीठाचे हे वाण खरीप आणि लेट खरीप कांदा लागवडीसाठी वापरतील.
पोलिस बंदोबस्तात विक्रीराहुरी विद्यापीठात कांद्याचे वाण घेण्यासाठी नगर, नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यातील विविध भागातून दरवर्षी शेतकरी गर्दी करतात. यंदा ही गर्दी टाळण्यासाठी विद्यापीठाने विभागात १० कांदा बियाणे विक्री केंद्रांची व्यवस्था केली. तरीही विद्यापीठात येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढतीच होती. अनेक शेतकऱ्यांनी रात्रीच विद्यापीठात मुक्काम ठोकून सकाळी बियाणे रांगेत उभे राहण्याला प्राधान्य दिले. अशा शेतकऱ्यांना विद्यापीठाने कुपनची सोय उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या मुक्कामाची सोय विद्यापीठातील गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली. प्रत्यक्ष विक्रीच्या वेळेस गर्दी अनियंत्रित होऊ नये म्हणून यंदाही पोलिसांचा बंदोबस्त मागवावा लागल्याचे विद्यापीठाचे बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके यांनी सांगितले.
फुले समर्थ कांदा बियाणांचे वैशिष्ट्य १. हे कांद्याचे मुलभूत बियाणे आहे. ज्याला ब्रीडर सीड असे म्हणतात. शेतकऱ्यांनी हे बियाणे नेले की त्यापासून ते स्वत:चे बियाणे स्वत: तयार करू शकतात.२. कांदा ८६ ते ९० दिवसात काढणीस तयार होतो. त्यामुळे दोन-तीन पाण्याच्या पाळ्यांची बचत होते.३. त्याचा रंग गडद लाल आणि कापल्यावर एक रिंग असलेला हा कांदा असतो. त्याला सिंगल रिंग कांदा असेही म्हणतात.४. या बियाणाची लागवड केल्यावर जोड कांदा शक्यतो येत नाही.५. उत्पादित कांद्याचा आकार एकसारखा असतो. त्यामुळे त्याला बाजारात मागणीही चांगली असते.६. या वाणापासून खरीप हंगामात २८० क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत, तर रांगड्या किंवा लेट खरीप हंगामात ४०० क्विंटल प्रति हेक्टर कांदा उत्पादन मिळते.
फुले बसवंत कांद्याचे वैशिष्टय१. हे वाण खरीप व रब्बी दोन्ही हंगामासाठी उपयुक्त आहे.२. कांदे आकाराने मध्यम ते मोठे व शेंड्याकडे निमुळते असतात.३. रंग लाल गडद असून काढणीनंतर तीन ते चार महिने साठवता येतो.४. हेक्टरी उ्त्पादन २५० ते ३०० क्विंटलपर्यंत मिळते.
गुरूवार दिनांक २३ मे पर्यंत सुमारे १ कोटी ३५ लाख रुपयांची कांदा बियाणांची विक्री झाली होती. यंदा सुमारे विद्यापीठाकडे सव्वा दोन कोटी रुपये किंमतीचे बियाणे उपलब्ध आहेत. अजूनही ४० क्विंटल शिल्लक असून शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता लवकरच ते संपतील असे दिसतेय.- डॉ. आनंद सोळंके, प्रमुख शास्त्रज्ञ, बियाणे, महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठ, राहुरी
या ठिकाणी मिळेल बियाणे1) मध्यवर्ती विक्री केंद्र बियाणे विभाग राहुरी,94229218162) कृषि संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक, 96042611013) कांदा, लसूण व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक, 94212411754) कृषि संशोधन केंद्र, चास, जि. अहमदनगर 75886955675) कृषि संशोधन केंद्र, बोरगांव, जि. सातारा, 98506872536) कृषि महाविद्यालय, मालेगाव जि. नाशिक,94216107917) कृषि संशोन केंद्र लखमापुर,76985368738) कृषि विज्ञान केंद्र, धुळे, 82081711199) कृषि महाविद्यालय, पुणे, 940585460610) कृषि महाविद्यालय, हाळगाव ता. जामखेड जि. अहमदनगर 7588489762