पुणे : एकीकडे नव्या फॅशनचे कपडे बाजारात येत असताना नामशेष होत चाललेल्या हातमागावर विणलेल्या कपड्यांना दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास महामंडळाकडून लोकरीपासून हातमागावर कापड विणून त्याची विक्री केली जाते. या वस्तूंना बाजारात चांगली मागणी आहे.
मेंढीच्या लोकरीपासून हातमागावर तयार केलेल्या कापडाची मागणी वाढताना असून लोकरीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. महोत्सव, प्रदर्शन, कार्यक्रमामध्ये अशा वस्तूंना विशेष मागणी असते. त्याचबरोबर बदलत्या काळानुसार लोकरीपासून पारंपारिक पद्धतीने बनवलेले घोंगड्या, चादरी अशा वस्तू घेण्यांकडे नागरिकांचा कल वाढला आहे. काही वस्तू बनवण्यासाठी काही प्रमाणात कापसाच्या धाग्याचा वापर केला जातो.
लोकरीपासून या वस्तू बनवतात
चादर, मफलर, जेन, उशी, पूजा आसन, घोंगडी, सतरंजी, चादर, शाल अशा वस्तू लोकरीपासून बनवल्या जातात. धनगर समाजातील लोक खड्डा मागावर या वस्तू बनवतात त्यामुळे तयार व्हायला वेळ लागतो. हातमागावार या वस्तू बनवल्यामुळे वेळ आणि खर्चही वाचतो.
लोकरी वस्तूचे फायदे
लोकरी पासून बनवलेल्या जेन अन् उशा वापरल्याने स्नायूंचे दुखणे, संधीवात हे आजार बरे होण्यास आणि रक्ताभिसरण होण्यास मदत होते. यामुळे अनेक नागरिक अशा वस्तूंच्या वापराकडे वळले आहेत. या वस्तू उबदार असल्याने हिवाळ्यात वापरण्यासाठी प्राधान्य दिले जाते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास महामंडळाकडून प्रशिक्षण
दिवसेंदिवस हातमागावरील कपड्यांना आणि वस्तूला मागणी वाढत असल्याने अनेक खासगी संस्था आणि लोकंही या वस्तू बनवू लागले आहेत. शेळी आणि मेंढी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा खूप मोठा जोड व्यवसाय असून शेतकरीसुद्धा कापड बनवण्याचे प्रशिक्षण घेऊन आणि कापड विक्री करून अर्थार्जन करू शकतात. महामंडळाकडूनही या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येते. ज्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण घ्यायचे आहे अशा शेतकऱ्यांनी थेट महामंडळाशी संपर्क करणे आवश्यक आहे.