येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील बारावी शास्त्र शाखेमध्ये शिकत असणाऱ्या साई निवास पाटील या विद्यार्थ्याने उसाचे पाचट काढणारे यंत्र तयार केले आहे. राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी कारखान्याच्या बियाणे मळ्यात या यंत्राचे प्रात्यक्षिक पाहून साईचे कौतुक केले. यावेळी त्यांनी हे यंत्र शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असून, यंत्राचा प्रसार करण्याबरोबर आरआयटीच्या माध्यमातून पेटंट मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली.
साई पाटील याने आपला छोटा व जुना ट्रॅक्टर, गिअर बॉक्स, नायलॉन केबल आदींचा वापर करून उसाची पाचट काढणारे देशी यंत्र तयार केले. या यंत्राचा वापर करत असताना त्याला आलेल्या अनुभवातून त्याने काही दुरुस्त्याही केल्या आहेत. हे यंत्र एका दिवसात दोन एकर उसाचे पाचट काढते. यासाठी एकरी साडेतीन हजार रुपये आकारले जात आहेत. सध्या एक एकर पाचट काढायला ५-६ हजार रुपये खर्च येतो. सध्याच्या कमी मनुष्यबळाच्या पार्श्वभूमीवर या यंत्राचे महत्त्व मोठे आहे.
यावेळी शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील, गट अधिकारी संग्राम पाटील, अभिजीत कुंभार, रोहित साळुंखे, निवास पाटील (येडेमच्छिंद्र), विशाल पाटील, तेजस पाटील, अविनाश पाटील, विजय पाटील, राहुल पाटील, साखराळेचे विनोद बाबर, सचिन पाटील, प्रकाश पाटील, ऋतुराज चव्हाण आदी उपस्थित होते.