Join us

Best Tourism Village Karde : दापोलीतील कर्दे गाव कृषी पर्यटनात देशात अव्वल; दिल्लीमध्ये झाला गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 5:55 PM

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या कृषी पर्यटन (agro tourism) श्रेणीमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट गाव म्हणून दापोली (dapoli) तालुक्यातील कर्दे (karde) गावाची निवड करण्यात आली आहे. दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात सरपंच सचिन तोडणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या कृषी पर्यटन श्रेणीमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट गाव म्हणून दापोली तालुक्यातील कर्दे गावाची निवड करण्यात आली आहे. दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात सरपंच सचिन तोडणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाकडून दरवर्षी पर्यटनातील विविध क्षेत्रांचे पुरस्कार दिले जातात.

या स्पर्धेत देशातील ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९८१ गावे सहभागी झाली होती. यातील आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ३६ गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली. यातील कृषी क्षेत्रासाठी कर्दे गावाची निवड करण्यात आली आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या प्रयत्नांसाठी कर्दे गावाला हा सन्मान मिळाला आहे.

मिनी महाबळेश्वर समजल्या जाणा या दापोली तालुक्यातील अनेक गावांनी आपली स्वतंत्र ओळख जपली आहे. कर्द गावही अशी स्वतंत्र ओळख असलेले आहे. स्वच्छ समुद्रकिनारे, पांढरी वाळू, नयनरम्य परिसर यामुळे हे गाव पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. कृषी पर्यटन, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासाचा दृष्टिकोन बाळगून कर्दै गाव मार्गक्रमण करत आहे.

पर्यावरणीय पर्यटनाला चालना देण्यासाठी येथे नैसर्गिक संसाधनांचा वापर, जल व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन यासह विविध उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे कर्दे गावाची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जागतिक पर्यटनदिनी शुक्रवार, २७ रोजी दिल्ली येथे हे पुरस्कार वितरण झाले. पर्यटन संचालनालयाचे सह संचालक स्वप्नील कापडणीस, सरपंच सचिन तोडणकर, उपसरपंच दत्ताराम भुवड आणि कृषी अधिकारी सुनील खरात यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडूनही अभिनंदन

या स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ.बी. एन. पाटील यांनी करें ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांचे आणि या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व व्यावसायिकांचेहीं अभिनंदन केले आहे. कर्दै गावाने मिळवलेले यश महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे आणि इतर भागांना प्रेरणा देणारे आहे, अशा शब्दात कर्दे गावचे कौतुक करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे कृषी पर्यटनात आणखी मोठी झेप घेण्याची प्रेरणा गावाला मिळाली आहे.

आमच्याशी व्हॉटसअप्पद्वारे जोडण्यासाठी 'या' लिंकवर क्लिक करा.

टॅग्स :पर्यटनशेती क्षेत्रदापोलीमहाराष्ट्रग्रामीण विकास