Join us

तुमचं गावं पर्यटनस्थळ केंद्र म्हणून नावारूपाला येणार, केंद्र सरकारची बेस्ट टुरिझम व्हिलेज स्पर्धा 

By गोकुळ पवार | Published: November 29, 2023 7:42 PM

Nashik : नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण विभागात पर्यटन संचालनालयाकडून ‘ सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव’ ही स्पर्धा राबविण्यात येत आहे.

Nashik : नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण विभागात पर्यटन संचालनालयाकडून ‘ सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव’ ही स्पर्धा राबविण्यात येत आहे. या स्पर्धेअंतर्गत नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमधून विविध आठ श्रेणीत प्रत्येकी पाच अर्ज मागविण्यात आले आहेत. जवळच्या प्रसिद्ध पर्यटनस्थळाच्या गावातील ग्रामपंचायत किंवा त्या गावाच्या विकासासाठी कार्यरत अशासकीय सामाजिक संस्थेकडून अर्जाद्वारे ऑनलाइन नोंदणी करू शकता, अशी माहिती पर्यटन संचालनालयाकडून देण्यात आली आहे.

अलीकडे ग्रामीण भागातील अनेक गावे पर्यटनकेंद्र होऊ लागली आहेत. निसर्गरम्य वातावरण, धबधबे आदींमुळे पर्यटकांचा राबता पाहायला मिळतो. याच पार्श्वभूमीवर गावागावांत पर्यटनाला चालना मिळावी व तेथील पर्यटनस्थळे, कलासंस्कृती, परंपरा, वैशिष्ट्यपूर्ण वारसास्थळे, लोकसंस्कृतीची माहिती सर्वत्र पोहोचावी, यासाठी केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीने ‘ बेस्ट टुरिझम व्हिलेज ’ व ‘ बेस्ट होम स्टे’ स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेद्वारे जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाची निवड केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येकी तीन गावे वारसा, कृषी, पर्यटन, हस्तकला, जबाबदार पर्यटन, साहसी पर्यटन, वेलनेस, व्हायब्रेंट अशा आठ श्रेणींमधून निवडण्यात येणार आहेत. 

यासाठी नामांकन दाखल करण्याचे आवाहन नाशिकच्या पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई राठोड यांनी केले आहे. अर्जाचा विहित नमुना ऑनलाइन पर्यटनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट गाव म्हणून निवडण्यात आलेल्या गावाला पर्यटन मंत्रालयाकडून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कारप्राप्त गाव भारत सरकारच्या विविध पोर्टल्स व संकेतस्थळावर झळकणार आहे. यामुळे आपल्या गावाला भारताच्या नकाशावर पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट म्हणून आणण्याची ही एक संधी सरकारने दिली असून, डिसेंबरअखेर नोंदणीची मुदत असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

बेस्ट रूरल होम स्टे स्पर्धा

ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात तसेच गावपातळीवर पर्यटन करणाऱ्या पर्यटकांना तेथील रुचकर भोजनासह निवासाची व्यवस्था व्हावी, जेणेकरून पर्यटकांना मुक्काम करता येईल, यासाठी ‘ बेस्ट रूरल होम स्टे’ स्पर्धा घेण्यात येत आहे. यासाठी किमान एक वर्ष कार्यरत असलेल्या निवास व्यवस्थेचे संचालक एकूण 14 पैकी जास्तीत जास्त 3 श्रेणींमध्ये अर्ज करून स्पर्धेत सहभागी होऊ शकतात, असे पर्यटन संचालनालयाकडून प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

टॅग्स :पर्यटननाशिकशेती