आजच्या धावपळीच्या जीवनात वैज्ञानिक युगामध्ये पर्यटनाला वेगळेच महत्व प्राप्त झालेले आहे. कित्येक देशामध्ये तसेच देशातील अनेक भागामध्ये ऐतिहासिक किल्ले, धरणे, पुरातन वास्तू यांचा उपयोग सध्या पर्यटनासाठी करण्यात येत आहे. परंतू आता ग्रामीण भागातील संस्कृती, निसर्ग, पशुपक्षी, ग्रामीण भागातील जीवनशैली ही शहरी भागामध्ये पहावयास मिळत नाही. त्यामुळे धावपळीच्या जीवनात विरंगुळा म्हणून शहरी भागातील जनता आता ग्रामीण भागातील या जीवनशैलीकडे पर्यटन म्हणून पाहू लागली आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कृषि पर्यटन हा एक पुरक व्यवसाय म्हणून नावा रुपाला येत आहे.
शहरी जीवनात दैनंदिन ताणतणाव कमी करण्यासाठी शहरातील नागरीक राज्याच्या विविध भागात शेतक-यांनी सुरु केलेल्या कृषि पर्यटनाला प्राधान्य देताना दिसत आहेत आणि त्यांची पावले आपोआपच ग्रामीण भागातील कृषि पर्यटनाकडे वळू लागली आहेत. ग्रामीण जीवन शैलीचे शिक्षण आणि करमणूक हे दोन्ही हेतू मनात ठेऊन कृषि पर्यटन साधणे शक्य आहे. शहरी भागातील नव्या पिढीला जुन्या ग्रामीण संस्कृतीची ओळख करुन देण्याबरोबरच खेड्यातील शेतकरी वर्गाला उत्पादन, रोजगार व अर्थसहाय्य मिळवून देण्याचा व्यापक दृष्टीकोन कृषि पर्यटन या संकल्पनेमध्ये आहे. शेती आणि पर्यटन यांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे कृषि पर्यटन होय.
कृषि व्यवसाय हा भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग असून महाराष्ट्र राज्यातील शेतक-यांची तर शेतो ही केवळ उपजीवीका नसून जीवनशैली आहे. राज्यातील सुमारे 55 ते 60 टक्के लोक प्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, शेळी व मेंढी पालन, कुक्कुट पालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिकापालन, मत्स्यव्यवसाय इ. कृषि संलग्न विषयाचा एकत्रित विचार करुन विकास घडवून आणल्यास ग्रामीण भागामध्ये कृषि पर्यटनाला निश्चितपणे चालना मिळू शकते.
कृषि पर्यटनाला चालना
आजमितीस कृषि पर्यटन संदर्भात शासनाची कोणतीही स्वतंत्र योजना अस्तित्वात नाही, त्याकरिता फलोत्पादन तसेच इतर संलग्न विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजना एकत्रित करुन शेतक-यांना त्याचा लाभ दिल्यास ग्रामीण भागामध्ये कृषि पर्यटन केंद्र विकसित होणे सहज शक्य आहे. त्याचबरोबर सध्या कृषि पर्यटनाची कोणतीही योजना अस्तिवात नसल्याने अनेक शेतकरी आपआपल्या कल्पना व सोयीनुसार कृषि पर्यटन राबवितांना आढळून येतात. या सर्वांना समान नियमांच्या छताखाली आणणे हे शासनाचे कर्तव्य ठरते व त्यातूनच पर्यटकांची योग्य सोय व सुरक्षा साधता येईल व त्यांना या माध्यमातून यथायोग्य मनोरंजन, विरंगुळा व समाधान लाभता येईल.
1 दशलक्ष रोजगार निर्मिती
उपरोक्त ध्येय साधण्यासाठी शासनाचा पर्यटन विभाग कृषि पर्यटन योजना राबवू इच्छितो. महाराष्ट्र शासनाने 2016 च्या शासन निर्णयानुसार पर्यटनाचे नवे धोरण सुरु केले असून या धोरणाअंतर्गत पर्यटनक्षेत्रामध्ये वार्षिक 10 टक्के उत्पन्नात व राज्याच्या सकल उत्पनात पर्यटन क्षेत्राचा 15 टक्के वाटा प्राप्त करण्याचे उद्दिष्टे ठेवले आहे. तसेच 2025 पर्यंत 1 दशलक्ष रोजगार निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या बाबीची उदिष्ट गाठण्यासाठी कृषि पर्यटन धोरण राबविणे आवश्यक आहे. तसेच, याच धोरणांतर्गत ग्रामोण पर्यटन, कृषि पर्यटन ही योजना राबविण्याची संकल्पना समाविष्ट आहे.