Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > चुकीच्या चारा व्यवस्थापनामुळे जनावरे बुळकांडी सारख्या आजारांना बळी

चुकीच्या चारा व्यवस्थापनामुळे जनावरे बुळकांडी सारख्या आजारांना बळी

Animals succumb to diseases like bulkandy due to wrong fodder management | चुकीच्या चारा व्यवस्थापनामुळे जनावरे बुळकांडी सारख्या आजारांना बळी

चुकीच्या चारा व्यवस्थापनामुळे जनावरे बुळकांडी सारख्या आजारांना बळी

कसा द्याल जनावरांना चारा?

कसा द्याल जनावरांना चारा?

शेअर :

Join us
Join usNext

रविंद्र शिऊरकर 

राज्यावर चाराटंचाईचे सावट गडद होताना दिसत आहे.  जनावरे जगवण्यासाठी शेतकऱ्यांना चारा व्यवस्थापनाचा मोठा प्रश्न पडला आहे.  यंदा पावसाच्या तऱ्हांमुळे पिकांवर रोग पडले. परिणामी आहे ते पीक जनावरांना चारा म्हणून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मका पीकाचा मुरघास चारा जनावरांना देण्यास सुरुवात केली. मात्र, मुरघास चाऱ्याच्या चूकीच्या व्यवस्थापनामुळे जनावरे बुळकांडीसारकख्या आजारांना बळी पडतानाचे चित्र परिसरात दिसत आहे.  वैजापूर तालुक्यातील मोठे गोठे असणाऱ्या शेतकऱ्यांना सोडले तर एक दोन जनावरे असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जनावरांना या रोगाची लागण होताना दिसून आले आहे.

ग्रामीण भागात फेरफटका मारला तर घरासमोर दावणीला दोन चार जनावरे नक्कीच आढळून येतात. घरची दुधाची गरज पूर्ण करत चारा पाण्याचे दोन पैसे मिळतील या अपेक्षेने बरेच जण एक किंवा दोन गाई सांभाळतात.  शेत नसेल आणि मजुरी करावी लागते अशा परिस्थितीत ज्या शेतात कामाला जायचं तिथूनच थोडे फार गवत घेऊन येणे किंवा मग गावाच्या बाजूला असलेल्या शेवरी, लिंब, बोर आदींचा पाला चारा म्हणून देत बरेच जण  जनावरांना जगवत आहेत.  तर काही जण शेळी, मेंढी, गाय म्हैस पालन हे व्यावसायिक दृष्टिकोनातून किंवा शेतीला जोडधंदा म्हणून करत आहेत. 

आज घडीला आपण गावागावांत गेलो तर बैल, गाय, म्हैस, शेळी लवकर नजरेस पडत नाही. मात्र, घरासमोर मुरघासचे बोध (गोणी)  दिसून येतात. सुकलेला चारा बांधणे, गोळा करणे, त्यांना व्यवस्थिती रचून ठेवणे आदी कामांना फाटा देत आता घरोघरी 'मक्केची कुट्टी' करून त्याद्वारे मुरघास केला जातो. 

घरोघरी मुरघास आला सोबतीला नेपियर, हत्ती गवत, मारवेल गवत, मेथी घास, दशरथ घास यांची हिरवी वैरण आली मात्र या आधुनिक वैरणीच्या जाळ्यात बऱ्याच ठिकाणी सुक्या चाऱ्याची वैरण ज्यात ज्वारी चा कडबा, बाजारीचे सरमाड (मराठवाडा आणि विदर्भात बाजरीच्या चाऱ्या साठी प्रचलित शब्द), आदी नाहीसे होत आले आहेत. तसेच मका मुरघाससाठी असणारी योग्य अवस्था बऱ्याच ठिकाणी लक्षात न घेता कणीस मोडून उर्वरित चाऱ्यापासून मुरघास केला जातो. तर कधी जवळपास पूर्णपणे वाळलेल्या मका चाऱ्यापासून मुरघास केला जातो. परिणामी, अनेक जनावरांना बुलकांडी सारखे आजार सुरु झाले आहे.

पाऊस चांगला असला तर शेतकऱ्यांकडे मुबलक हिरवा चारा उपलब्ध असतो मात्र जेव्हा पाऊस नसतो तेव्हा फक्त सुका चारा अशी एक सारखी वैरणचं काही शेतकरी जनावरांना देतात. टोटल मिक्स रेशन म्हणजे सुका आणि हिरवा चारा असं एकत्रित देताना शेतकरी दिसून येत नाही ज्यामुळे एक-दोन जनावरे सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांकडे बुलकांडी सारखे आजार दिसून येतात. 
- डॉ भगवान कवाडे (खासगी पशुधन पर्यवेक्षक, वैजापूर)

असा द्या जनावरांना चारा

एका मोठ्या जनावराला १५-१७ किलो हिरवा, ७ ते ८ किलो सुका चारा प्रतिदिन दिला गेला पाहिजे. ज्यामुळे त्या जनावराची पचन क्रिया व्यवस्थित कार्य करते. पण बऱ्याच दा शेतकरी एक सारखी वैरणचं सकाळ संध्याकाळ देतात. तसेच आता मुरघास निमिर्ती वाढल्यापासून काही शेतकरी दोन्ही वेळेस जनावरांना मुरघास देतात पण यात हा मुरघास योग्य व्यवस्थापन करून केलेला नसतो. त्याला बुरशी लागते तर कधी काळवंडलेला असतो अश्या अवस्थेमुळे जनावरे बुलकांडी ला बळी पडतात. - सुधीर चौधर (पशुधन विकास अधिकारी, शिऊर)

 

Web Title: Animals succumb to diseases like bulkandy due to wrong fodder management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.