सदानंद औंधे
मिरज : शासनाने गायदूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रति लिटर ५ रुपये अनुदान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघाकडील ७९ हजार ३६२ गाय दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर ९ कोटी ५८ लाख ५१ हजार ५० रुपये रक्कम अनुदान जमा करण्यात आले आहे.
११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीत संघाकडे पाठवलेल्या दुधाचे हे अनुदान आहे. १० मार्चपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी माहिती पाठवली नाही त्यांना आता १५ एप्रिलपर्यंत माहिती पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर संबंधितांना अनुदान मिळणार असल्याचे जिल्हा दुग्धविकास अधिकारी नामदेव दवडते यांनी सांगितले.
१० जानेवारी ते १० फेब्रुवारी या एक महिन्यासाठी अनुदान योजना होती. शेतकऱ्यांच्या प्रतिसादामुळे योजना १० मार्चपर्यंत वाढविली. जिल्हा दुग्धविकास विभागाने माहिती संकलित केली. जिल्ह्यात दररोज सुमारे १५ लाख लिटर दूध उत्पादन असून, खासगी व सहकारी दूध संघांशी संलग्न सुमारे एक लाख गाय दूध उत्पादक आहेत.
त्यापैकी ७९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाली आहे. ही रक्कम ९ कोटी ५८ लाख रुपये असल्याचे दवडते यांनी सांगितले. १० मार्चपर्यंत संघांनी सादर केलेल्या माहितीनुसार हे गाय दूध उत्पादक अनुदानास पात्र ठरले. तर काही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पाठवलेली माहिती दुग्धविकास विभागाकडे प्राप्त झाली नाही.
त्यामुळे बरेच उत्पादक अनुदानापासून वंचित राहिले आहेत. उर्वरीत दूध उत्पादकांना याचा लाभ मिळावा अशी मागणी होत होती. त्यानुसार उर्वरित उत्पादकांना १५ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील गाय दूध उत्पादकांना शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाच प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर ७० हजारहून अधिक उत्पादकांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुग्धविकास विभागाचे त्यांनी आभार मानले आहेत.
जिल्ह्यात वाटप करण्यात आलेल्या अनुदानापैकी चितळे डेअरीच्या ५० हजार सभासदांच्या १ कोटी २० लाख लिटर दुधास सर्वाधिक ६ कोटी रुपये व राजारामबापू दूध संघाकडील १५ हजार सभासदांच्या ३६ लाख लिटर दुधास १ कोटी ६४ लाख रुपये अनुदान मिळाले आहे. त्या खालोखाल इतर सहकारी व खासगी दूध संघांतील सभासदांना अनुदान मिळाले आहे.