Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > ॲझोला कमी खर्चातील पौष्टिक पशुखाद्य

ॲझोला कमी खर्चातील पौष्टिक पशुखाद्य

Azola is a low cost nutritious animal feed | ॲझोला कमी खर्चातील पौष्टिक पशुखाद्य

ॲझोला कमी खर्चातील पौष्टिक पशुखाद्य

अझोलामध्ये आवश्यक अमिनो आम्ले, जीवनसत्त्वे, क्षार आणि शरीर वाढीसाठी आवश्यक घटक मुबलक प्रमाणात आहेत. अझोलामध्ये उच्च प्रथिने आणि कमी लिग्रिन असल्याने जनावरे अझोला सहज पचवू शकतात.

अझोलामध्ये आवश्यक अमिनो आम्ले, जीवनसत्त्वे, क्षार आणि शरीर वाढीसाठी आवश्यक घटक मुबलक प्रमाणात आहेत. अझोलामध्ये उच्च प्रथिने आणि कमी लिग्रिन असल्याने जनावरे अझोला सहज पचवू शकतात.

शेअर :

Join us
Join usNext

अझोलामध्ये विविध खाद्य घटक जसे प्रथिने, आवश्यक अमिनो आम्ले, जीवनसत्त्वे (अ, ब आणि बीटा कॅरोटिन), क्षार (कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, लोह, तांबे, मॅग्नेशिअम) व शरीरवाढीसाठी आवश्यक घटक मुबलक प्रमाणात असतात. अझोलामध्ये आवश्यक अमिनो आम्ले, जीवनसत्त्वे, क्षार आणि शरीर वाढीसाठी आवश्यक घटक मुबलक प्रमाणात आहेत. अझोलामध्ये उच्च प्रथिने आणि कमी लिग्रिन असल्याने जनावरे अझोला सहज पचवू शकतात. अझोलाचे घरच्या घरी कमी खर्चात उत्पादन घेणे शक्य आहे.

शुष्क घटकांच्या प्रमाणानुसार, अझोलामध्ये २५-३५ टक्के प्रथिने, १० ते १५ टक्के क्षार आणि ७ ते १० टक्के अमिनो आम्ले, जैविक घटक पॉलिमर असतात. जनावरांना अझोला थेट अथवा खुराकात मिसळून देता येते. गाई, म्हशी, शेळी, वराह, कोंबड्यांना अझोलाचा खाद्य म्हणून वापर करता येतो.

अझोला उत्पादन घ्यावयाची पद्धत
अझोला लागवड करावयाची जमीन समतल व थोडी उंचवट्यावर असावी.
योग्य आकारांचे वाफे करून अझोलाचे उत्पादन घेता येते. अझोलाचे उत्पादन घेण्यासाठी झाडांच्या किंवा ५०% शेडनेटच्या कृत्रिम सावलीमध्ये आपल्या गरजेनुसार वाफे तयार करावे.
वाफा तयार करण्यासाठी विटांची २ मी. X ४ मी. आयताकृती रचना करावी. या खड्ड्याची खोली साधारणपणे ३० सें.मी. असावी.
प्लॅस्टिकचे कापड विटांनी बनविलेल्या आयताकृती खड्ड्यामध्ये अंथरावे.
१० ते १५ किलो चाळून घेतलेली चांगली माती खड्ड्यामध्ये पसरावी.
दोन किलो शेण, ३० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट हे १० लिटर पाण्यात मिसळून एकजीव करून खड्ड्यात कागदावरील मातीवर पसरवून गादी करावी. त्यावर पाण्याची पातळी १० सें.मी. होईपर्यंत पाणी टाकावे. त्या नंतर ५०० ग्रॅम ते एक किलो अझोलाचे कल्चर समप्रमाणात पसरावे. त्यावर ताजे पाणी शिंपडावे.
सुरवातीला १४ दिवसानंतर ॲझोल्याची पुर्ण वाढ होऊन त्याचा जाड हिरव्या गालिच्याप्रमाणे पाण्यावर थर दिसू लागतो.
सरासरी २० ग्रॅम सुपर फॉस्फेट व एक किलो शेणाचे पाण्यातील मिश्रण आठवड्यातून एकदा या खड्ड्यात मिसळावे. जेणेकरून अझोलाची वाढ झपाट्याने होऊन दैनंदिन ५०० ग्रॅम उत्पादन मिळेल. शिफारशीनुसार मॅग्नेशिअम, लोह, तांबे, सल्फर इ. क्षार असणारे मिश्रण दर आठवड्याला यात मिसळावे.
दर २ महिन्यातून एकदा २ ते ३ किलो चाळलेली माती या खड्ड्यात मिसळावी, यामुळे मातीतील जास्तीचे नायट्रोजन जमा होऊन अन्नघटकांची कमतरता होणार नाही.
दर सहा महिन्यांनी गादीमधील माती, पाणी बदलावे. नवीन अझोला कल्चर यात सोडावे.
जर अझोलामध्ये रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्याची विल्हेवाट लावून नव्याने अझोला लागवड करावी.
सुरवातीच्या लागवडीनंतर १५ दिवसांनी रोज उत्पादन मिळू शकते. अझोला गोळा करण्यासाठी चाळणी वापरावी.
गोळा केलेला अझोला स्वच्छ पाण्याने दोन तीनदा धुवावा, जेणेकरून त्याचा शेणाचा वास निघून जाईल. त्या नंतर अझोला
गोणपाटावर २-३ तास सुकवावा.
ॲझोला वाढीसाठी तापमान २० ते २८ अंश सेल्सिअस, स्वच्छ सूर्यप्रकाश, ६० ते ८० टक्के आर्द्रता योग्य प्रमाणात पाणी
(पाच ते १२ से.मी.) आणि सामू चार ते ७.५ इतका योग्य असतो.
अझोला धुण्याच्या वेळी जाळीवर धुतला तर छोटे वाढ न झालेले अझोलाचे तुकडे चाळून बाहेर येतात. हे तुकडे पुन्हा अझोला खड्ड्यामध्ये सोडावेत.
तापमान २५ अंश सेल्सिअसचे आत ठेवल्यास वाढ जोमाने होते.
अझोला खड्ड्याच्यावर शेडनेट बांधल्यास तीव्र सूर्यप्रकाशापासून त्याचे संरक्षण होईल.
उत्पादित ॲझोला रोजचे रोज काढणे आवश्यक आहे. अन्यथा, खड्ड्यामध्ये अझोला वाढीसाठी कमी जागा ठरेल.
शिफारशीनुसार दुधाळ जनावरांच्या रोजच्या आहारात दोन ते तीन किलो अझोला मिसळला तर जनावरांच्या दुधात वाढ होते.
दुग्ध उत्पादनात कोणताही बदल न होता, अझोला हे जनावरांच्या खुराकासाठी सर्वसाधारणपणे १५ ते २० टक्के इतक्या प्रमाणात योग्य पुरक खाद्य म्हणून वापरता येते. जेणेकरुन पशुखाद्यावरील खर्च कमी करता येतो. शिवाय दुधाची गुणवत्ता वाढ आणि जनावरांची तब्येत चांगली राहून आयुष्यमान वाढते.

डॉ. जी. एस. सोनवणे
विशेषज्ञ, पशु अनुवंश व पैदास शास्त्र विभाग
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा

Web Title: Azola is a low cost nutritious animal feed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.