Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > सावधान, तुमच्या जनावरांना विषबाधा झाली, तर असे करा उपाय

सावधान, तुमच्या जनावरांना विषबाधा झाली, तर असे करा उपाय

Be careful, if your dairy animals get poisoned, do this remedy | सावधान, तुमच्या जनावरांना विषबाधा झाली, तर असे करा उपाय

सावधान, तुमच्या जनावरांना विषबाधा झाली, तर असे करा उपाय

जनावरांना विषबाधेचा संशय आल्यास विषबाधा निर्माण करणाऱ्या कारणाचा विचार करून ते तत्काळ दूर करावे. उदा. खाद्यातून, पाण्यातून विषबाधा झाल्यास ते खाद्य अथवा पाणी जनावरास देऊ नये. ते फेकून न देता त्याच्या नमुन्याची तपासणी पशवैद्यकाद्वारे करून घ्यावी.

जनावरांना विषबाधेचा संशय आल्यास विषबाधा निर्माण करणाऱ्या कारणाचा विचार करून ते तत्काळ दूर करावे. उदा. खाद्यातून, पाण्यातून विषबाधा झाल्यास ते खाद्य अथवा पाणी जनावरास देऊ नये. ते फेकून न देता त्याच्या नमुन्याची तपासणी पशवैद्यकाद्वारे करून घ्यावी.

शेअर :

Join us
Join usNext

चरावयास जाणाऱ्या जनावरांमध्ये विषबाधेचे प्रकार जास्त प्रमाणात आढळतात. कारण ही जनावरे खाद्य वनस्पतीसोबत काही अखाद्य-विषारी पदार्थ देखील खातात. पर्यायाने त्यांना विषबाधा संभवते. केवळ वनस्पतींमुळेच नव्हे, तर कीटकनाशक, घातक रसायने याशिवाय आपसातील हेवेदावे यातून शत्रूच्या जनावरांना विष देऊन मारणे हे प्रकार देखील कमी नाहीत.

नैसर्गिक विषबाधा 
निसर्गात आढळणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पती या ज्याप्रमाणे औषधी म्हणून उपयुक्त आहेत, त्याच प्रमाणे असंख्य वनस्पती या विषारी देखील आहेत. उदा. घाणेरी, धोतरा, गाजरगवत इत्यादी. या वनस्पतींप्रमाणेच विविध खनिजद्रव्ये उदा. फ्युरिन, शिसे, तांबे इ. जर जनावरांच्या खाण्यात आले, तर त्यापासून जनावरांना विषबाधा संभवते.

मानवनिर्मित कारणाने होणारी विषबाधा 
मानवनिर्मित कारणे ही अपघाताने होणारी विषबाधा व आपसांतील वैरामुळे मुद्दाम केलेली विषबाधा अशा दोन प्रकारांत होते. अपघाताने होणाऱ्या विषबाधेचे प्रमाण हे जास्त आहे. यात कीटकनाशके फवारणी कलेले पीक जनावराने खाणे अथवा घरात ठेवलेली कीटकनाशक विषारी पदार्थ जनावराने खाणे, यामुळे ही विषबाधा होऊ शकते.

कीटकनाशके अथवा घातक रसायने तयार करणाऱ्या कारखान्याच्या सांडपाण्यातून जनावरांना विषबाधा संभवते. कीटकनाशक ही साधारणत ॲल्यूमिनिअमच्या बाटलीमध्ये विकली जातात. कीटकनाशकाच्या बापरानंतर अशा बाटल्या नष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. परंतू बरेच शेतकरी त्या परत बापरात आणतात व अशा बाटल्यामध्ये ठेवलेल्या पदार्थांमुळे विषबाधा संभवते. आपसातील वैर, हेवेदावे यामुळे शत्रूच्या जनावरांना विषप्रयोग करून मारणे हा प्रकार मोठ्या प्रमाणात आढळतो. यात घातक रसायनांचा वापर, गुंज या बनस्पतीचा वापर विशेषत: आढळतो.

कीटकनाशके फवारलेल्या शेतात जनावरे जाऊ देऊ नयेत. कीटकनाशकांचा साठा शक्यतो घरात करू नये अथवा ते जनावराच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी घ्यावी. जनावराचे खाद्य व कीटकनाशके एकाच खोलीत साठवून ठेवू नयेत. कीटकनाशकांचे डबे, बाटल्या यांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावावी. अशा बाटल्या वापरात आणू नयेत.

जनावरांच्या अंगावरील कमी उदा. गोचीड, उवा, माशा यासाठी कीटकनाशकांचा वापर करतात. अशा वेळी जनावरांच्या शरीरावर एखादी जखम असल्यास कीटकनाशकाचा वापर करू नये. गोचीड, उवा मारण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करत असताना कीटकनाशकांच्या प्रमाणाकडे लक्ष द्यावे व याकरिता पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.

रंग कामाकरिता वापरात येणारे तेल, रंग, वार्निश याचा संपर्क जनावरांच्या खाद्याशी येऊ नये. यात शिसे या धातूचा वापर केलेला असतो. पर्यायाने यापासून विषबाधा संभवते.

जनावरांच्या गोठ्यात पशुपालकाने नियमित जावे. यामुळे जनावरांच्या वागणुकीतील झालेला बदल व त्याचे इतर आजार अथवा विषबाधेच्या लक्षणाशी असलेला सबंध लगेच लक्षात येईल.

जर एखाद्या गाईस किंवा म्हशीस विषबाधा झाली, तर अशा जनावराचे दूध तिच्या वासरास अथवा आपल्या खाण्यात येऊ नये. अशा दुधापासून देखील विषबाधा संभवते.

विषारी वनस्पतीची ओळख पशुपालकास असावी. यामुळे अशा बनस्पती जनावराच्या खाण्यात येणार नाहीत याची काळजी घता येते.

जनावरांना कुरणात चरावयास नेत असताना त्या ठिकाणचे पिण्याच पाणी ओढा, नाला यात कारखान्याचे सांडपाणी सोडले असल्यास असे दुषित पाणी जनावरे पिणार नाहीत याची काळजी घ्यावी.

विषबाधेचा संशय आल्यास विषबाधा निर्माण करणाऱ्या कारणाचा विचार करून ते तत्काळ दूर करावे. उदा. खाद्यातून, पाण्यातून विषबाधा झाल्यास ते खाद्य अथवा पाणी जनावरास देऊ नये. ते फेकून न देता त्याच्या नमुन्याची तपासणी पशवैद्यकाद्वारे करून घ्यावी.

विषबाधेवर सर्वसाधारण उपचार 
विषबाधा झाल्यास सर्वप्रथम जनावरास रोज जे खाद्य व पाणी आपण देतो ते सर्व बंद करून त्याऐवजी त्यास दुसरे खाद्य व पाणी द्यावे, कारण याच खाद्यातून विषबाधा झालेली असल्यास त्याची तीव्रता वाढते.

शरीरात गेलेले परंतु शोषण न झालेले विष पदार्थ शरीराबाहेर काढण्याकरिता उलटी व संडास लागणारी औषधे द्यावीत. (रवंथ करणारे प्राणी उलटी करू शकत नाहीत अशा प्राण्यांमध्ये विरेचक औषधींचा वापर करावा.)

श्वसनास त्रास होत असल्यास श्वसन उत्तेजक औषधीचा वापर करावा. ज्या विषबाधेवर हमखास उपाय नाही. त्यामध्ये खालील मिश्रणाचा वापर करावा.

दोन भाग कोळशाची पावडर, एक भाग टॅनिक आम्ल व एक भाग मॅग्नेशिअम ऑक्साईड. यात कोळशामुळे शोषण न झालेले विष कोळशात शोषण होते. टॅनिक आम्लामुळे अल्काईड व काही धातूजन्य विष निष्क्रिय होण्यास मदत होते. तर मॅग्नेशिअम ऑक्साईडमुळे संडास पातळ होऊन त्याद्वारे विष बाहेर फेकले जाते.

आम्लधर्मी विष नष्ट करण्याकरिता अल्कलीचा वापर करावा. उदा. चुन्याचे पाणी, मॅग्नेशिअम ऑक्साईड इ.

अल्कलीधर्मी विष नष्ट करण्याकरिता आम्लाचा वापर करावा. उदा. ५% ॲसिटिक आम्ल, व्हिनेगर इ.

टिंचर आयोडीन 
१५-२० थेंब एक ग्लास पाण्यातून दिल्यास अल्कलॉईड, शिसे व पारा ही विषद्रव्ये निष्क्रिय होण्यास मदत होते.

या व्यतिरिक्त यकृत उत्तेजक, ग्लुकोज / सलाईनचा वापर वापर करावा. कुठलाही अपरिचित आजार हा विषबाधा असू शकतो. हा विषशास्त्राचा नियमच आहे. जनावरांमधे विषबाधेचे प्रमाण फार मोठे आहे. विषबाधेमुळे अनेक जनावरे दगावली, असे प्रकार अनेक ठिकाणी होतात.

जनावरांमधील विषबाधा ही नेहमीच आढळणारी समस्या आहे. विषबाधेचे निदान होणे व त्यावर उपचार करेपर्यंत बराच उशीर होतो व यात त्याचा मृत्यू संभवतो. त्यामुळे विषबाधेच्या प्रकारात पशुस तात्काळ पशुवैद्यकाद्वारे उपचार करावा.

- प्रा. डॉ. सुधीर राजूरकर, 
प्रमुख, पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी 
संपर्क क्र. : ९४२२१७५७९३ (केवळ सायंकाळी ६ ते ७ याच वेळेत) 

(लेखक पशुवैद्यक शास्त्रात पीएचडी असून औषधी व विषशास्त्र या विषयातील तज्ज्ञ आहेत. त्यांचे आजतागायत अनेक संशोधनपर लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झालेले आहेत.)

Web Title: Be careful, if your dairy animals get poisoned, do this remedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.