मानव जे अन्न सेवन करतो, ते वनस्पती वर्गीय फळभाज्या आणि अन्नधान्य असते. प्राणीजन्य अन्नात उदा. दूध आणि दुधाचे पदार्थ, जसे की आईस्क्रीम ,पनीर, श्रीखंड ,आम्रखंड इत्यादीचा समावेश असतो. मागील ३० वर्षाच्या काळामध्ये जमिनीचे आरोग्य बिघडले, कारण युरिया, डीएपी, एसएसपी इत्यादी खतांचा आणि कीटकनाशकांचा बेसुमार वापर झाला. खत आणि कीटकनाशक यांचे अंश जमिनीमध्ये आणि पाण्यामध्ये मुरले. त्यांचे अवशेष फळ, भाजीपाला, अन्नधान्य, दूध आणि दुधाचे पदार्थ यांच्यामध्ये आले. गाय म्हैस ,जो,चारा, खातात; त्यामध्ये हे अवशेष सापडतात.
खत आणि कीटकनाशक यांचे अवशेष चाऱ्याच्या माध्यमातून जनावरांच्या खाण्यात आल्यामुळे जनावरे वारंवार आजारी पडत आहेत. त्यांना दुरुस्त करण्यासाठी इंजेक्शन दिले जातात. हे इंजेक्शनचे अवशेष ४ ते ११ दिवस परत दूध आणि दुधाचे पदार्थ यात येतात, त्यामुळे असे दूध पिण्यास हानिकारक ठरते. असे हानिकारक दूध माणसाच्या आहारात आल्यास माणसे लवकर आजारी पडतात किंवा लवकर दुरुस्त होत नाहीत.
याचा अर्थ जमिनीचे आरोग्य, जनावराचे आरोग्य आणि माणसाचे आरोग्य यांचा एकमेकांमध्ये घनिष्ठ संबंध आहे. हे सगळे एकमेकाला साखळी रूपाने जोडले गेलेले आहेत. त्यामुळे याच्यावर एकच उत्तर आहे, माणसाचे आरोग्य सुधारायचे असेल तर जनावरांचे सुधारले पाहिजे आणि जनावरांच्या आरोग्य सुधारायचे असेल तर जमीन सुधारली पाहिजे. यासाठी एक यशोगाथा समजून घेऊ.
आपण बाजारातून कोबीचा गड्डा आणतो आणि त्याची भाजी करतो. कोबीला एवढ्या फवारण्या असतात की विचारता सोय नाही.चार वेळा कोबी धुवून आणि भरपूर मसाला टाकून सुद्धा त्याच्यातले रसायनांचे विष कधी कमी होत नसते. विषमुक्त शेती किंवा नैसर्गिक शेती या पद्धतीने शेती करणारे रवींद्र शहा हे इचलकरंजी येथे राहतात.त्यांच्याकडे १४ एकर शेती आणि ४० देशी गायी आहेत.
मागील ८ वर्षापासून आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. या ८ वर्षात त्यांनी गो-आधारित शेती केली असून एकदाही कीटकनाशकांची फवारणी केली नाही किंवा रासायनिक खतांचा वापर केला नाही.त्यामुळे त्यांची जमीन आणि जनावरे खऱ्या अर्थाने विषमुक्त म्हणता येईल.आज त्यांच्या शेतामध्ये ज्या भाज्या निघतात, त्या कच्च्या खाल्ल्या तरी इतक्या चविष्ट असतात,की विचारता सोय नाही.
म्हणून जे बाजारामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात आपण विष खरेदी करतो,त्याऐवजी गो -आधारित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन/ गोशाळेमध्ये जाऊन आपण त्यांनी पिकवलेलं अन्नधान्य,फळ, भाजीपाला, दूध आणि दुधाचे पदार्थ खरेदी करून आपले शरीर विषमुक्त करावे आणि त्यांनाही सहकार्य करावे. त्यासाठी इचलकरंजीसारखे प्रयोग पाहायला हवेत आणि स्वत:ही करायला हवेत.
डॉ. प्रशांत प्रभाकर योगी,
पशुचिकित्सक व दुग्धव्यवसाय मार्गदर्शक
मोबाईल 8624070972