रविंद्र शिऊरकर
गेल्या काही महिन्यांपासून दुधाचे दर कमी झाले असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य भर मोठ्या प्रमाणात आंदोलने पुकारले होते यावर तोडगा काढत शासनाने दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले. त्या संदर्भात नुकत्याच झालेल्या शासनाच्या बैठकीत मात्र हे अनुदान फक्त सहकारी दूध संघांना लागू असल्याचे सांगत सोबत यासाठीचे काही नियम व अटी जाहीर केल्या. ज्यात गाईंना एअर टॅग (Ear Tag) गरजेचे असलेले नमूद केले आहे. हे एअर टॅग म्हणजे काय त्याचा फायदा काय होतो सोबत हे आपल्या गाईंना कसे लावायचे हे आपण जाणून घेऊया.
एअर टॅग म्हणजे काय?
एअर टॅग म्हणजे गाईंच्या कानाला लावण्यात येणारा पिवळा टॅग ज्याला एक क्रमांक असतो. हा क्रमांक म्हणजे गाईंचा आधार क्रमांक ज्यामध्ये गाईची जात (ब्रिड), टॅग नोंद होतानांचे वय, सोबत गाईंच्या मालकाचे नाव व मोबाईल क्रमांक अशी सर्व माहिती असते.
अधिक वाचा: शेतकऱ्यांनो हे कराल, तरच मिळेल दुध अनुदान
एअर टॅग काय काम करतं?
एअर टॅग मुळे त्या गाईंची ओळख पटवणे सोपे जाते. तसेच या टॅगमुळे भविष्यात गाव, तालुका, जिल्हा, राज्य स्तरांवर पशुपालकांकडे असलेल्या गाईंची संख्या किती यांची नोंद घेणे सोपे जाते. ज्यामुळे सरकार दरबारी पशुसंवर्धनाच्या योजना आखण्यात मदत होते.
एअर टॅगिंग कशी करावी?
आपल्या जवळच्या सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, यांच्याशी संपर्क करून त्यांना सांगितल्यास ते उपलब्ध टॅग नुसार गाईंना एअर टॅग लावून नोंद घेतात. यासाठी शेतकऱ्यांना कुठलाही खर्च येत नाही.