पिंपरी : डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आयोजित आठवे आंतरराष्ट्रीय डेअरी व फिड प्रदर्शन गुरुवार (दि. २४) ते शनिवार (दि. २६) या कालावधीत चिंचवड येथील ऑटोक्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे होणार आहे.
उद्या, गुरुवारी सकाळी १०:३० वाजता केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. गोकुळ दूध संघांचे अध्यक्ष अरुण डोंगळे, संचालक डॉ. चेतन नरके, चितळे बंधू मिठाईवालेचे इंद्रनील चितळे, जाफा कॉम्फीडचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद वाघ, आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. डेअरी व पशुखाद्य निर्मिती व्यावसायिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन आपला व्यवसाय अत्याधुनिक करावा, असे आवाहन माहिती संयोजक प्राची अरोरा व सहयोगी आनंद गोरड यांनी केले आहे.
प्राची अरोरा म्हणाल्या, "प्रदर्शनाचे हे आठवे वर्ष आहे. डेअरी व पशुखाद्य निर्मिती उद्योगासंबंधीच्या देशविदेशामधील सुमारे १०० कंपन्यांच्या मशिनरींची प्रात्यक्षिके याठिकाणी पाहता येतील. प्रदर्शनात अभ्यासपूर्ण व्याख्यान व चर्चासत्र होणार आहेत."
या विषयावर चर्चा
आनंद गोरड म्हणाले, "गोठा व्यवसाय, जनावरांचे आरोग्य व आहार व्यवस्थापन, क्लीन मिल्क प्रोडक्शन, लॅबोरेटरी सेटअप, लॅब तपासणीच्या पद्धती, डेअरी प्लांट मशिनरी, दूध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे आधुनिक तंत्रज्ञान, पॅकेजिंग व साठवणूक तंत्रज्ञान, डेअरी प्रॉडक्ट्स निर्यातीमधील संधी, डेअरी व्यवसाय व आयातनिर्यात, पशुखाद्य निर्मिती, मशिनरी सेट-अप, कच्या मालाची निवड, फॉर्म्युलेशन, पोल्ट्री, मत्स्य व पशुखाद्य मार्केटची स्थिती यावर चर्चा होणार आहे.