Join us

चारा बियाण्यांसाठी मिळणार १०० टक्के अनुदान; कुठे कराल अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 4:12 PM

शेतकऱ्यांच्या शेतावर वैरणीचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

राज्यातील वैरण उत्पादनामधील काढण्याकरिता पशुपालकांकडे तूट भरून तसेच असलेल्या पशुधनाला पुरेशी हिरवी वैरण उपलब्ध होण्यासाठी, जास्तीत जास्त क्षेत्रावर वैरणीचे उत्पादन घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर वैरणीचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

पशुव्यवस्थापनामध्ये मुरघास टीएमआरच्या वापरास प्रोत्साहन देणे, पशुधनाच्या दैनंदिन आहारामध्ये खनिज मिश्रणाचे महत्त्व पाहता, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रमांतर्गत मुरघास तयार करण्यासाठी मुरघास बॅग्ज खरेदीस अनुदान, मुरघास वापरासाठी अनुदान, टीएमआर वापरासाठी अनुदान आणि खनिज मिश्रण पुरवठा करण्यासाठी अनुदान या विविध चार उपघटकांचा समावेश करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रमांतर्गत खालील नमूद विविध उपघटकांचा समावेश करून सन २०२३-२४ पासून राज्यात राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

योजनेचे निकष- या अंतर्गत वैरण बियाणांचा पुरवठा करताना लाभार्थीकडे वैरण उत्पादनासाठी स्वतःची शेतजमीन व सिंचनाची सुविधा असणे आवश्यक आहे. या कार्यक्रमांतर्गत ज्वारी, मका, बाजरी, बरसिम, लुसर्न, न्यूट्रीफिड व इतर बियाणे तसेच नेपियर, यशवंत, जयवंत इ. सुधारित बहुवर्षीय गवत प्रजातींची ठोंबे वाटप करावीत.- ज्या लाभार्थीकडे स्वतःची जनावरे आहेत किंवा ज्या लाभार्थीकडे जनावरे नाहीत. या योजनेंतर्गत प्राधान्य देण्यात यावे.प्रति लाभार्थी एक एकरच्या क्षेत्रात वैरण उत्पादन घेण्यासाठी १०० टक्के अनुदानावर ४ हजार रुपयांच्या मर्यादेत वैरणीच्या बियाणांचा पुरवठा करण्यात येत आहे.- वैरण बियाणे व ठोंबांची खरेदी राष्ट्रीय बियाणे महामंडळ, राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), इतर शासकीय संस्था, कृषी विद्यापिठे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळांतर्गतची प्रक्षेत्रे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळांतर्गतची प्रक्षेत्रे यांच्याकडून करण्यात यावी.- वैरण बियाणांचे वाटप करण्यापूर्वी लाभार्थ्यांना वैरण पिकांच्या लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात यावे. वैरण बियाणे वाटप करताना हंगामानुसार वैरण पिकांची निवड करण्यात यावी. वैरणीच्या पीक/ठोंबाकरिता आवश्यक खते, जीवाणू संवर्धके शेतकऱ्याने स्वतःच्या खर्चाने खरेदी करावीत.या कार्यक्रमांतर्गत कोणत्याही प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ घेता येईल तसेच लाभार्थीस एका हंगामात एकदाच लाभ देण्यात यावा.- या शासन निर्णयात अंतर्भूत असलेल्या विविध ६ उपघटकांसाठी लाभार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्राप्त करून घेऊन लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार.- मुरघास वापरासाठी अनुदान, टीएमआर वापरासाठी प्रोत्साहनपर अनुदान आणि खनिज मिश्रणासाठी अनुदान या उपघटकांतर्गत ज्या लाभार्थ्याकडे दुधाळ व गाभण पशुधन (गाई व म्हशी) आहे केवळ अशाच लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा.- अनुदानाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे अदा करण्यात यावी, संबंधित आर्थिक वर्षात एका कुटुंबातील एका लाभार्थ्यास एकाच उपघटकांतर्गत लाभ द्यावा.

कुठे कराल अर्ज?- योजनेंतर्गत प्रस्ताव मंजूर करणे व प्रत्यक्ष निधी वितरणाकरिता पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. त्यानुसार गावागावातील शेतकऱ्यांनी जवळच्या पशूवैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क साधावा.- संबंधित शेतकऱ्यांना गावातील पशू वैद्यकीय कार्यालयातच अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याठिकाणी योग्य कागदपत्रे सादर करुन योजनाचे लाभ घ्यावा.

पुणे जिल्ह्यात सध्या या योजनेंतर्गत बियाणे वाटप सुरू आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी बियाणे पेरणी केली आहे. यासाठी ४००० रुपयांपर्यंत अनुदान मिळते. प्रत्येक पशु वैद्यकीय दवाखान्यांमध्ये ऑफलाईन अर्ज उपलब्ध आहेत. त्याठिकाणी कागदपत्रे सादर करुन लाभ घ्यावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा. - विष्णू गर्जे, पशुसंवर्धन अधिकारी, पुणे जिल्हा

टॅग्स :शेतकरीपीकगायदूधसरकारराज्य सरकार