अतुल जाधव
देवराष्ट्रे : यावर्षी अतिवृष्टी व पाऊस भरपूर झाल्यामुळे कापूस बियांचा तुटवडा निर्माण झाला. यामुळे इतिहासात पहिल्यांदाच सरकीने उच्चांकी दराचा आकडा पार केला आहे.
सरकी सद्यस्थितीला ४२ ते ४४ रुपये प्रतिकिलो दर आहे. मात्र, दुधाचा दर २८ रुपयांवर थांबला आहे. पशुखाद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र बिघडले आहे.
त्यातच दुधाच्या दरात मोठी मंदी असल्यामुळे दूध उत्पादक अडचणीत आला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक असणारी सरकी पेंड, गोळी पेड यांच्या कच्च्या मालाच्या किमती प्रचंड वाढल्यामुळे कंपन्यांनी सरकी व गोळीपेंड दरामध्ये वाढ केली आहे.
सरकीचे मार्केट कच्च्या उत्पादनावर अवलंबून असल्यामुळे व कच्चे उत्पादनाचे दर वाढल्यामुळेपेंडीचे दर वाढले आहेत. सध्या चांगल्या सरकीला भाव ४२ ते ४४ रुपयांपर्यंत गेला आहे. मक्याच्या किमती वाढल्यामुळे गोळी पेंडमध्येही प्रचंड वाढ झाली आहे.
दरात २५ टक्के वाढ
विविध कंपन्यांच्या गोळी पेंडमध्ये गेल्या दोन वर्षात दरामध्ये २५ टक्के वाढ केली आहे. दूध दरात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. शासन म्हैसला अनुदान देत नसल्यामुळे म्हैस दूध उत्पादक तोट्यामध्ये व्यवसाय आहे. तसेच गाय दुधाला थोडेफार अनुदान मिळत असल्यामुळे ना नफा ना तोटा या तत्त्वावर तो टिकून राहिला आहे.
पशुखाद्याचे दर
पशुखाद्य (दर प्रतिकिलो)
सरकी - ४२
दुधाची गोळी पेंड - ३५
मीडियम गोळी पेंड - ३१
गहू भुसा - २७
मका चुनी - ३२
शेंगदाणा पेंड - ४८
उडीद कळना - २५
लहान वासरांचे खाद्य - ३७
कडबा कुट्टी - १३