राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार पुरवणी मागणी, पुनर्विनियोजनाद्वारे निधी उपलब्ध करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.विधानसभेतील चर्चेत सभागृहाला उत्तर देताना ते बोलत होते.
राज्यात दररोज १ कोटी ६० लाख लिटर दुधाचे संकलन होते. त्यानुसार शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी २८३ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यापैकी २०४ कोटींचा निधी पुरवणी मागणीद्वारे व उर्वरित निधी पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. असे ते म्हणाले. योजनेच्या अंमलबजावणीसाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे त्यांच्या आधार संलग्न खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येणार आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
शेतकऱ्यांचा पशुपालनाकडे अधिक कल वाढावा म्हणून शासनाच्या वतीने योजना राबवून प्रोत्साहन देण्यात येत आहे. गत दोन महिन्यांत दुधाच्या दरात सातत्याने चढ-उतार होत होते. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत होते. शेतक-यांची ही समस्या जाणून घेऊन राज्य शासनाने प्रयोगिक तत्त्वावर गायीच्या दुधाला प्रतिलिटर ५ रुपयांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.