Join us

दुधाळ गाय- म्हशींसाठी ३ हजार ३५७ अर्ज; केवळ ४७० पात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 5:00 PM

योजना पूर्णत्वास येण्यासाठी १८ कोटींच्या निधीची गरज

 पशुसंवर्धन व दुग्धविकास जलद गतीने व्हावा यासाठी राज्य शासनाने समाजकल्याण विभागांतर्गत दुधाळ पशुधन वाटप योजना राबविली जात आहे. योजनेसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. याअंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार ३५७ गरजूंनी अर्जाद्वारे दुधाळ गायी-म्हशींची मागणी केली. मात्र, ४७० लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ घेता आला आहे.. उर्वरित गरजू अर्जदारांनी कशाच्या आधारावर पोट भरायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे...

'अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थी दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे' या योजनेनुसार २०२२ साठी जिल्ह्यातील अनेकांनी अर्ज भरले होते. एकूण ८५ हजार ६१ रुपयांच्या या योजनेसाठी ६३ हजार ७९६ रुपयांचे शासकीय अनुदान व २१ हजार २६५ रुपये लाभार्थी भरणा आहे. दोन गायी किंवा दोन दुभत्या म्हशी मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने अर्ज दाखल केले. मात्र, प्रथम अर्ज- प्रथम मान्यता' धोरणानुसार केवळ ४७० लाभार्थी पात्र ठरले आहेत. पात्र लाभार्थीना या योजनेतून पैसे कधी मिळणार ? अशी चर्चा शेतकऱ्यांमधून आहे.

गेवराई तालुक्यातील सर्वात जास्त लाभार्थी 

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे 64 लाभार्थी पात्र ठरले आहेत. तालुक्यासाठी 40 लाख 82 हजार 944 रुपये प्राप्त झाले असून वडवणीच्या वाट्याला केवळ 17 लाभार्थी व दहा लाख 84 हजार 532 रुपये आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

संबंधितदुध व्यवसाय करताय? सरकार अनुदानावर देतंय दुधाळ गायी- म्हशी, जाणून घ्या सविस्तर...लाभार्थी निवडीस प्राधान्य

■ दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी

■ अत्यल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टरपर्यतचे भूधारक)

■ सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)

■ महिला बचत गटातील लाभार्थी

...तर स्वप्न पूर्ण होईल... अन्यथा सहा वर्षे वाट बघावी लागेल

  • जिल्ह्यातील २ हजार ८८७ अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. 
  • सर्व अर्जदारांना दुधाळ जनावरांचे वाटप होण्याकरिता जिल्ह्यासाठी १८ कोटी ४१ लाख ७९ हजार रुपयांची आवश्यकता आहे. 
  • मात्र, २ कोटी ९९ लाख रुपयेच बीडच्या वाट्याला आल्याने अर्ज प्रलंबित राहिले आहेत. 
  • अशाच पद्धतीने वार्षिक निधी पुरवठा होत राहिल्यास अर्जदारांना सहा वर्षे वाट बघावी लागणार आहे. 

लाभार्थिना निधीचे वाटप

या योजनेंतर्गत जिल्ह्यात २ कोटी ९९ लक्ष रुपये किमतीची दुभती जनावरे वितरित करण्यात आली आहेत. दरम्यान, शासनाने पुरवठा केलेला सर्व  निधी या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे. - विजय चौरे,पशुसंवर्धन विकास अधिकारी, बीड

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीबीडसरकारी योजना