वाळकीतील बैल, संकरित गाई, गावरान गाई, म्हशी, घोडे यांचा आठवडे बाजार मंगळवार (दि. (१०) पासून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. पूर्वी जनावरांचा बाजार सोमवारी भरत होता. आता दर मंगळवारी भरणार आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी जनावरांच्या बाजारात ६५ लाखांची उलाढाल झाली.
वाळकी (ता. नगर) येथील बैलबाजाराला दीडशे वर्षांची परंपरा होती. हा बाजार गावालगत असलेल्या वालूंबा नदीच्या मोठ्या पात्रात दर सोमवारी भरत होता. महाराष्ट्रातील नव्हे, तर शेजारच्या राज्यांतील व्यापारी व शेतकरीही वाळकीच्या बाजारात खरेदी-विक्रीसाठी येत असत. मात्र, सततच्या वाढत्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत गेल्याने बाजारात येणाऱ्या जनावरांची संख्या घटल्यामुळे हा बाजार बंद झाला होता. काही वर्षांपूर्वी हा बाजार पुन्हा सुरू करण्यात आला होता.
मात्र, सरकारने नोटबंदी केली अन् सुरू झालेला बाजार पुन्हा बंद पडला होता. परंतु, व्यापाऱ्यांनी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन जनावरांच्या बाजारास गतवैभव मिळवून देण्याचा निर्धार करीत वाळकीचा बाजार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. वाळकी ग्रामपंचायत, व्यापारी, ग्रामस्थ यांच्यामार्फत बाजारासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
भाजी, शेळ्या, मेंढ्यांचा बाजार सोमवारीच
जनावरांचा बाजार मंगळवारी भरवण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी शेळ्या, मेंढ्या, भाजीपाला, कापडविक्रीसह इतर जीवनावश्यक वस्तूंचा आठवडे बाजार पूर्वीप्रमाणेच दर सोमवारी भरवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यामुळे दोन्ही बाजारांमुळे एकाच दिवशी होणारी गर्दी टाळली जाणार आहे, असे सांगण्यात आले.