राज्यातील ७४४९ गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर शनिवारी ७३ लाख ३१ हजार रुपयांचे अनुदान जमा झाले. पहिल्या दहा दिवसांचे हे अनुदान असून सर्वाधिक ४७९५ शेतकऱ्यांचे ३२ लाखाचे अनुदान हे 'गोकुळ'दूध संघाचे आहे. उर्वरित शेतकऱ्यांना तातडीने अनुदान देण्यासाठी दुग्ध विभागाची यंत्रणा सक्रिय झाली आहे.
राज्यात गाय दुधाचे दर घसरले आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सहकारी दूध संघ प्रतिलिटर ३३ रुपयांनी दूध खरेदी करतात, मात्र राज्यातील उर्वरित सहकारी व खासगी दूध संघ मनमानी पध्दतीने दूध घेतात. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
त्याला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ११ जानेवारीपासून गाय दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात एक महिन्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला, मात्र अजूनही दुधाचे दर कमीच असल्याने १० मार्चपर्यंत अनुदानाची मुदत वाढवली आहे.
हे अनुदान देण्यासाठी शासनाने अॅपव्दारे दूध खरेदी, पशुधनाची माहीती भरण्यास सांगितले आहे. मात्र, माहिती भरणे क्लिष्ट असल्याने अचूक माहिती भरल्याशिवाय नाव पुढे जात नाही.
पहिल्या दहा दिवसात (११ ते २० जानेवारी) दूध पुरवठा केलेल्या ७४४९ शेतकऱ्यांची माहीती परिपूर्ण भरली असून त्यांना शनिवारी ७३ लाख ३१ हजार रुपये अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आली. उद्या, सोमवारी शेतकऱ्यांना ती बँकेत मिळणार आहे. या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकरी वर्गास चांगलाच दिलासा मिळाला आहे.
'कोयना', 'राजारामबापू', 'गोकुळ'चा समावेश
पंधरा संघाशी संलग्न दूध उत्पादकांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आले आहेत. १५ पैकी 'कोयना', 'राजारामबापू' व 'गोकुळ' हे तीन सहकारी दूध संघ आहेत. उर्वरित खासगी संघाचे उत्पादक आहेत.
खासगींचे अनुदान अधिक
राज्यातील ७४४९ दूध उत्पादकांपैकी ५०७८ सहकारी दूध संघाचे आहेत. त्यांना ३२ लाख ७० हजार ९१० रुपये अनुदान मिळाले. मात्र, खासगी दूध संघांचे केवळ २३७१ उत्पादक असताना त्यांना ४० लाख ४४ हजार ९० रुपयांचे अनुदान जमा झाले.
संघनिहाय अनुदान असे
दूध संघ | शेतकऱ्यांची संख्या | अनुदान |
गणेश मिल्क, पुणे | ८२ | १ लाख ४८ हजार ७१० |
राम मिल्क, पुणे | १० | १ लाख ३२ हजार ८४५ |
साई प्रसाद, पुणे | ६३ | १ लाख ४० हजार ८०५ |
श्रीकृष्ण डेअरी, सातारा | ३३ | ५७ हजार ४०५ |
सावंत डेअरी, पुणे | १०८ | ३ लाख ५९ हजार ९२० |
कोयना सह. सातारा | ४६ | ४२ हजार ७०५ |
कोयना सह. सातारा | २ | ६३ हजार ८७५ |
संतोष मिल्क, सातारा | ४ | ६३ हजार ८७५ |
अग्रणी मिल्क, सांगली | १८९ | २ लाख ४२ हजार ४७५ |
'गोकुळ', कोल्हापूर | ४७९५ | ३२ लाख १५ हजार ६८० |
श्रीकृष्ण, सातारा | ३७ | ६१ हजार ५६५ |
राजारामबापू, सांगली | २३५ | १ लाख ९७ हजार ३३५ |
श्री वागेश्वर डेअरी, पुणे | २१७ | ५ लाख १४ हजार २४० |
कुतवळ, पुणे | २११ | ३ लाख १३५ |
चितळे, सांगली | १४१७ | १८ लाख २४ हजार ७८० |