बीड जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेती हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. अशातच शेतकऱ्यांना पशुधनाच्या चारापाण्याची चिंता लागली आहे. पुढील काळात राजा- सर्जाचा खर्च पेलता येणार नाही, म्हणून शेतकरी पशुधन बाजारात विक्रीसाठी घेऊन जात आहेत. लाखाची जोडी शेतकऱ्यांना नाइलाजाने ५० ते ६० हजारांना विकावी लागत आहे. असा प्रकार रविवारी बीड जिल्ह्यातील नेकनूरच्या आठवडी बाजारात दिसून आला. तसेच मंगळवारी गेवराई तालुक्यातील हिरापूर येथील आठवडी बाजार जनावरांच्या गर्दीने फुलून गेला होता.या वर्षी राज्यासह बीड जिल्ह्यातही पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे विहीर, तलाव, बंधाऱ्यात पाणी आले नाही. आता विहीर आणि जलसाठ्यांमधील पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. काही ठिकाणी तर जलसाठे कोरडेठाक दिसून येतात. आता ग्रामीण भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून संभाव्य पाणीटंचाई, चाराटंचाई लक्षात घेता बळीराजा पशुधन विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. पुढील महिन्यात कडक उन्हाळा सुरू झाल्यानंतर गाय, बैल, म्हशीच्या चाऱ्याची व्यवस्था करणे शेतकऱ्यांना आवाक्याबाहेर जाणार आहे. आताजनावर विकले तर बऱ्यापैकी पैसे येतील, या आशेने शेतकरी पशुधन घेऊन बाजारात घेऊन येत आहेत. दिवसेंदिवस जनावरे बाजारात येण्याची संख्या वाढली आहे.
बैलजोडीमागे ५ ते १० हजारांचा तोटा
मागील वर्षी ८० हजार रुपये खर्च करून बैलाची जोडी विकत घेतली होता. आता नेकनूरच्या बाजारात गाडी करून बैलजोडी विकायला आणली आहे, परंतु व्यापारी २० ते २५ हजारांत मागत आहेत.- विभीषण धवन, शेतकरी, रा. वानगण
बाजारात ग्राहक नसल्याने बैलाच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे. याचा फटका व्यापाऱ्यांनाही बसत आहे. एका बैलजोडीमागे पाच-दहा रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.- प्रवीण ससाने, व्यापारी, हिरापूर
चाराच उपलब्ध नाही, जनावरांना विकण्याची वेळ
यंदा चारा उपलब्ध नसल्यामुळे जनावरांना विकाये लागत आहे. काही दिवसांनंतर मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. ५० हजारांत घेतलेली गाय बेभाव २५ हजारांना विकावी लागली आहे.- गौतम घोडके, शेतकरी, रजाकपूर
चारा-पाण्याची टंचाई असल्यामुळे नाइलाजाने जनावरे विकावी लागत आहेत. परंतु, बाजारातही खरेदीदार नाहीत. जनावरे बाजारात विकली जात नसल्यामुळे संकटात सापडलो आहोत.- विष्णू लोणकर, शेतकरी, निपाणी जवळका