जनावरांना पुरेसा व सकस चारा मिळत नसल्याने दूध उत्पादन घटते. त्यामुळे जनावरांसाठी योग्य, पोषक चाऱ्याचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण योग्य, पोषक चाऱ्यावरच दूध वाढ आणि गुणवत्ता अवलंबून आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे हिरवा चारा मिळणे शक्य होत नाही. त्यासाठी शेती अभ्यासक पल्लवी चिंचवडे यांनी काही सोपे उपाय सुचविले आहेत.
उन्हाळ्यात अगदी कमी खर्चात, कमी जागेत उत्पादित करता येणारा आणि कमी पाण्यात येणारा चारा म्हणजे ॲझोला. ॲझोला ही पाण्यात वाढणाऱ्या शेवाळासारखी नेचे वर्गातील पाण्यावर तरंगणारी म्हणजे पाण्यात वाढणारी वनस्पती आहे. ॲझोलामध्ये २५ ते ३५ टक्के प्रथिने, ७ ते १० टक्के अमिनो आम्ल, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, तांबे, मॅग्नेशियम या सगळ्यांचे प्रमाण १० ते १५ टक्के असतात.
अझोलामध्ये अन्नपचनास साहाय्य करणारा घटक असल्याने, तसेच त्यात उच्च दर्जाची प्रथिने आणि लिग्निनचे प्रमाण कमी असते. म्हणून जनावरे अझोला सहज पचवू शकतात. त्यामुळे जनावरांच्या दुधामध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ होते.
कोंबड्यांसाठीसुद्धा लाभदायक
अझोला ही नैसर्गिक वनस्पती आहे. हा एक सेंद्रिय चारा म्हणून जनावरांसाठी अत्यंत फायदेशीर आहे, त्याचा काहीही दुष्परिणाम नाही. अझोला तयार करण्यासाठी अत्यल्प खर्च येतो व उत्पादन अधिक मिळते. दुभत्या जनावरांसोबतच मांसल (ब्रॉयलर) कोंबड्या, तसेच अंडी देणाऱ्या कोंबड्यांनाही पुरवून उत्पादन वाढवू शकतो. याचबरोबर शेळ्या, मेंढ्या, वराह यांना पुरविल्यास त्यांच्याही उत्पादनात चांगली वाढ पाहायला मिळते.
अझोला कसा तयार करावा?
झाडाच्या सावलीत किंवा ५० टक्के शेडनेटचा वापर करून ९ फूट लांब व ६ फूट रुंद व ९ इंच खोलीचा खड्डा करावा. सुरुवातीला छोटेखानी हा प्रयोग करावा. नंतर जसा जम बसेल तसे याचे प्रमाण वाढवायचे आहे. कारण कितीही ऐकलं पाहिलं तरी ही स्वतः अनुभव घेतल्या शिवाय याचा अंदाज येत नाही.
त्यामध्ये येणाऱ्या अडचणी समजत नाही. पाणी झिरपू नये म्हणून चांगल्या प्रतीच्या प्लास्टिक किंवा पॉलिथिनने खड्डा आच्छादून घ्यावा. १२-१५ किलो माती प्लास्टिकवर पसरवून घ्यावी. त्यावर ३-४ किलो चांगले कुजलेले गायीचे शेण व ३०-४० ग्रॅम प्रोम १० लिटर पाण्यात चांगले मिसळून हे मिश्रण खड्यात सोडावे. आता यामध्येही एक अडचण जाणवते ती अशी की, शेण-मातीमुळे आपल्याला पाणी दर दोन ते तीन महिन्यांनी बदलावे लागते.
तसेच शेणाचा वास अझोलाला लागतो. त्यामुळे जनावरे खात नाहीत. म्हणून बरीच शेतकरी मंडळी अझोला एवढा फायदेशीर असूनही त्याचे उत्पादन घेण्यासाठी नकार देतात. त्यासाठी पर्याय म्हणून शेण, मातीऐवजी आपण दर ८ दिवसांनी मायक्रोन्यूट्रीअंट्स, जीवामृत, जिवाणू स्लरी यांसारखे पर्याय वापरून ही अडचण कायमची सोडवू शकतो.