उमेश धुमाळआंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बहुतांश शेतकऱ्यांमध्ये बेबी कॉ (मका बी) लागवडीचे प्रचलन वाढले आहे. अतिशय स्वस्तात व अतिशय कमी पाण्यावर तसेच कमी खर्चात असणारे पीक म्हणून बेबीकॉर्न पिकाकडे पाहिले जाते.
दूध उत्पादनात वाढ होतेच परंतु दुभत्या जनावरांना सकस आहार पुरवला जातो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या हातात बाराही महिने पैसा खुळखुळात असतो. कंसापेक्षा ताटांची उपयोगिता असल्याकारणाने येथील शेतकरी बेबी कॉर्न पिकाकडे वळला आहे.
येथील शेतकरी कंपन्यांबरोबर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग (हमीदराने) करून बेबी कॉर्न लागवडीचा कल मोठ्या प्रमाणात दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील विविध कंपन्या या भागातील शेतकऱ्याबरोबर कॉन्टॅक्ट फार्मिंग करतात.
म्हणजेच विकत घेण्याची हमी घेतात व शेतीशी निगडित अर्थकारणाचा समतोल ठेवण्यात मोलाचे सहकार्य करतात. या भागातील शेतकऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलेल्या विविध कंपन्या बेबी कॉर्नचे मका बी शेतकऱ्यांना आठशे रुपये किलो या दराने उपलब्ध करून देतात.
तसेच लागवडीनंतरही कंपन्या येथील शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शनही करतात. एकरी चार किलो बी अशाप्रकारे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केले जाते. लागवड पूर्ण झाल्यानंतर जवळपास पावणेतीन महिन्यात मका पिकाची कोवळी कणसे (बेबी कॉर्न) आठ रुपये किलो दराने कंपन्या स्वतः तोडून घेऊन जातात.
यात कुठली झंझट नसल्याने शेतकरी राजीखुशी तयार होतो व दिवसाआड तोडा होत असल्याने मोठ्या प्रमाणात कोवळी कणसे तोडली जातात. किलोला आठ रुपये भाव याप्रमाणे बियाचे पैसे वसूल होऊन बाऱ्यापैकी नफा येथील शेतकऱ्यांना या बेबीकॉर्न पिकातच होतो.
या कंपन्या मुख्यतः फ्रोजन फुड बनवणाऱ्या उद्योगात असतात. तसेच काही हॉटेल, रेस्टॉरंट व मसाले उद्योगात ग्रेव्ही बनवणाऱ्या कंपन्यांना माल विकला जातो.
दुभत्या जनावरांना मिळतोय चारा- कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलेल्या कंपन्या फक्त बेबी कॉर्न (कोवळी कणसे) नेत असल्यामुळे शेतकऱ्यांना आठ ते दहा फूट वाढलेल्या मका पिकाच्या ताटापासून मुरघास तयार करण्याचे तंत्रज्ञान अवलंबले आहे.- मुरघास बनवण्याचे तंत्रज्ञान येथील शेतकऱ्यांनी अवलंबल्यामुळे आठ ते दहा फूट वाढलेल्या मका पिकापासून येथील शेतकरी सहा ते आठ महिने टिकेल असे मुरघास तयार करतात. अशाप्रकारे दुहेरी फायद्याने येथील शेतकऱ्याच्या दुखत्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटवला जातो.- हा चारा सकस आहार असल्याकारणाने दुभत्या जनावरांची तब्येत चांगली राहते. दुभती जनावरे निरोगी राहतात. दुभत्या जनावरांना मुरघासामुळे सकस आहार मिळतो. दूध मोठ्या प्रमाणात मिळते. दुधातील फॅटचे प्रमाण वाढते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दुहेरी असा दुखत्या जनावरांपासून मिळणाऱ्या दुधातूनही पैसे मिळतात.
अधिक वाचा: दुध उत्पादन वाढवायचय; एक लिटर दूध देण्यासाठी हवंय इतके लिटर पाणी