Join us

हवामान आधारित जनावरांच्या गोठ्याचे नियोजन कसे करावे यासाठी आलंय नवीन मोबाईल अॅप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 12:29 PM

अॅपद्वारे शेतकऱ्यांना जनावरांचा उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी गोठ्यातील तापमान घटविण्याकरिता व योग्य आर्द्रता राखण्याकरिता सावलीची सोय करणे, योग्य वायु विजन राखणे, पिण्याकरिता थंड पाणी उपलब्ध करून देणे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या देशातल्या पहिल्या ‘फुले अमृतकाळ’ या पशुसल्ला मोबाईल प्रणालीचे (ॲप) लोकार्पण कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संग्राम जगताप, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू कर्नल डॉ. पी.जी. पाटील तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते.

यावेळी कृषिमंत्री श्री. मुंडे म्हणाले की, वातावरणीय बदलामुळे पावसाने दिलेली ओढ, अतिवृष्टी, ढगफुटी, वाढते तापमान, उष्माघात व पावसाचा अकल्पित लहरीपणा अशा गोष्टी वारंवार घडत आहेत.

त्यामुळे पशुधनास चारा व पाणी पुरविण्यावर आणि पशुधनाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. संकरित गाई व म्हशींमध्ये दुग्ध उत्पादनावर विपरित परिणाम होतो. दुभत्या गाईचे दूध उत्पादन ५ ते २० टक्क्यांपर्यंत घटल्याचे आढळून आले आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी हे ॲप महत्त्वाची भूमिका बजावेल.

या अॅपद्वारे शेतकऱ्यांना जनावरांचा उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी गोठ्यातील तापमान घटविण्याकरिता व योग्य आर्द्रता राखण्याकरिता सावलीची सोय करणे, योग्य वायु विजन राखणे, पिण्याकरिता थंड पाणी उपलब्ध करून देणे, फॅन किंवा फॉगर यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने सुरू करणे तसेच संतुलित आहार नियोजन इत्यादी उपाय योजना करण्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या जातील.

ॲपचा वापर असा करावा- या अॅपचा वापर करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून Phule Amrutkal हे अॅप डाऊनलोड करावे.डाऊनलोड करण्यासाठी लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=com.dairy.thi- त्यानंतर नोंदणी करून मोबाईल नंबर टाकावा.- ओटीपी प्राप्त झाल्यानंतर पत्ता व लोकेशन टाकून अॅप चालू करावे.- हव्या असलेल्या गाईंच्या गोठ्याचे किंवा स्थळाचे लोकेशन घेऊन त्या ठिकाणीचे तपमान आद्रता निर्देशांक मिळतो.- त्याद्वारे गाईंचा ताण ओळखून सल्ला मिळू शकतो.- हे अॅप ओपन सोर्स हवामान माहितीच्या बरोबरीनेच तापमान व आर्द्रतेचे सेन्सर्स वापरून मिळणाऱ्या प्रत्यक्ष माहितीच्या माध्यमातून तापमान आर्द्रता निर्देशांकाच्या आधारे शेतकऱ्यांना व्यक्तिगत सल्ला व सूचना पुरवते.

टॅग्स :दुग्धव्यवसायगायमोबाइलशेतकरीतंत्रज्ञानधनंजय मुंडेविद्यापीठ