Join us

एका शून्याने अडविले राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे दुधाचे अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 2:34 PM

गाईच्या दुधाचे प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान एका शून्यामुळे अडल्याचा प्रकार घडला आहे. अनुदानासाठी अर्ज भरताना एक्सेल शीटमध्ये बँक खात्यातील शून्य नोंदविता आले नाही, त्यामुळे हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.

अतुल जाधवदेवराष्ट्रे : गाईच्या दुधाचे प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान एका शून्यामुळे अडल्याचा प्रकार घडला आहे. अनुदानासाठी अर्ज भरताना एक्सेल शीटमध्ये बँक खात्यातील शून्य नोंदविता आले नाही, त्यामुळे हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. ऑनलाइन चुकांचे अनेक अडथळे पार करता करता शेतकऱ्यांची पुरती दमछाक होत आहे.

अनुदानासाठी दूध उत्पादकांची, उत्पादनाची माहिती संकेतस्थळावर भरावी लागते. त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक, जनावराचा टॅगिंग क्रमांक आदी माहिती एक्सेल शीटमध्ये भरून शासनाकडे पाठवावी लागते, डेअरी चालकांनी ही माहिती शासनाकडे तपासणीसाठी पाठवली, मात्र त्यातील अनेक शेतकऱ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी निघाल्या आहेत, ज्या दूध उत्पादकाचा बँक खाते क्रमांक शून्याने सुरू होतो, त्यांचे प्रस्ताव लटकले आहेत.

एक्सेल शीटमध्ये सुरुवातीला शून्य नोंदवता आले नाही. जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या माहितीमध्ये शून्य लिहायचा राहून गेला आहे. त्यामुळे हजारो उत्पादकांची अनुदानाची माहिती एका शून्यामुळे अडकून पडली आहे.

प्रस्तावामध्ये जनावरांचे टॅगिंग क्रमांक, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक यातील अनेक चुकांची दुरुस्ती त्या-त्यावेळी करण्यात आली, पण या शून्याचा निकाल कसा लावायचा? याचे कोडे डेअरी चालकांना आणि शेतकऱ्यांना सुटलेले नाही.

संगणक प्रोग्रॅम शून्य घेईनाएक्सेलमध्ये माहिती भरताना संगणक सुरुवातीला शून्य घेत नसल्याचे अनुभव आहेतः पण बँकांचे खाते क्रमांक शून्याने सुरू होत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. शून्य नसल्याने खाते क्रमांक सदोष दिसून येते, परिणामी अनेकांच्या अनुदानाच्या रकमा खात्यांवर जमा झालेल्या नाहीत.

दुरुस्तीची कार्यवाहीयासंदर्भात संबंधित अधिकारी गोपाळ करे यांनी सांगितले की, शून्याने सुरू होणाऱ्या बँक खाते क्रमांकाची दुरुस्ती करण्याची कार्यवाही सुरू आहे. अपूर्ण दिसणारे खाते क्रमांक लवकरच दुरुस्त होतील, त्यानंतर अनुदान दूध उत्पादकांच्या खात्यांवर जमा होतील.

अधिक वाचा: उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याने दूध खरेदी दरात वाढ

टॅग्स :दूधदुग्धव्यवसायदूध पुरवठासरकारशेतकरीराज्य सरकारबँकआधार कार्ड