Join us

सांगोल्यात माडग्याळ मेंढ्यांच्या खरेदी-विक्रीतून दीड कोटीची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 12:32 PM

Madgyal Mendhi सांगोला बाजारात माडग्याळ मेंढ्याला लाखापासून ते चोचदार माणदेशी माडग्याळ मेंढ्याला २५ लाख रुपयांची मागणी आली. बाजारात सर्वत्र माडग्याळ मेंढ्याचा बोलबाला दिसून आला.

अरुण लिगाडेसांगोला येथील धनगर समाजबांधवांनी शुक्रवारी नागपंचमी सणाचे औचित्य साधून भरविलेल्या माडग्याळ जातीच्या मेंढ्यांच्या बाजारात आटपाडी येथील सोमनाथ जाधव यांचा कर्नाटक महाराष्ट्राचा चॅम्पियन माडग्याळ मेंढा आकर्षण ठरला.

दरम्यान, बाजारात माडग्याळ मेंढ्याला लाखापासून ते चोचदार माणदेशी माडग्याळ मेंढ्याला २५ लाख रुपयांची मागणी आली. बाजारात सर्वत्र माडग्याळ मेंढ्याचा बोलबाला दिसून आला.

दिवसभर १ हजार माडग्याळ मेंढ्यांच्या खरेदी-विक्रीतून दीड कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगोला येथील हौशी मेंढपाळ बाबू मेटकरी यांनी सांगितले. माडग्याळ मेंढ्या बकरी बाजाराचे यंदाचे चौथे वर्ष होते.

सांगोल्यातील खिलार जनावरांचा बाजार जसा पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तशाच प्रकारे आता मांडग्याळ मेंढ्यांच्या बाजारामुळे कर्नाटक व महाराष्ट्रातील हौशी माडग्याळ मेंढपाळांच्या प्रसिद्धीस उतरला आहे.

नागपंचमी सणाचे औचित्य साधून सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात माडग्याळ मेंढ्याचा भव्य बाजार भरविला होता.

या बाजारासाठी सोलापूर जिल्ह्यासह शेजारील कर्नाटकातील, तसेच सांगली व सातारा जिल्ह्यातील धनगर समाजबांधव गुलाल व भंडाऱ्याची उधळण करीत माडग्याळ मेंढ्या-बकरी खरेदी विक्रीसाठी घेऊन आले होते.

यावेळी कोणी मेंढपाळाने मेंढ्यांच्या अंगावर  गुलाल, भंडारा टाकलेला तर कोणी मेंढपाळाने मेंढ्याला झूल पांघरलेली, फुलांनी सजवलेल्या मेंढ्या लक्षवेधी ठरल्या.

मेंढपाळांसाठी तीन बक्षिसेनागपंचमीनिमित्त सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरविल्या जाणाऱ्या माडग्याळ मेंढ्याच्या बाजाराला महाराष्ट्र कर्नाटकातील मेंढपाळांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सभापती समाधान पाटील व उपसभापती माणिकचंद वाघमारे यांच्या संकल्पनेतून मेंढपाळाने पाळलेल्या नामवंत माडग्याळ नर व मादी मेंढीला यावर्षीपासून पहिले, दुसरे व तिसरे क्रमांकाचे रोख स्वरूपात बक्षीस देऊन मेंढपाळांना प्रोत्साहन दिले.

मेंढ्यांची वाजत-गाजत मिरवणूकसांगोला (चांडोलेवाडी) येथील हौशी मेंढपाळ बाबू मेटकरी यांनी त्यांच्याकडील माडग्याळ जातीच्या मेंढ्यांची हालग्यांच्या निनादत वाजत गाजत "बिरोबाच्या नावानं चांगभलं" म्हणत गुलाल भंडाऱ्यांची उधळण करीत फटाके वाजवून मिरवणूक काढल्याने मेंढपाळांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, मेंढ्यांपासून लेंडी, कातडी माऊस, लोकर आदी काहीच वाया जात नसल्यामुळे धनगर समाजाची ठेवण आणि धन म्हणून मेंढ्या व बकऱ्या पाळल्या जातात, असे मेंढपाळ कुंडलिक एरंडे, संतोष पुजारी (आटपाडी) यांनी सांगितले

टॅग्स :शेतकरीशेळीपालनबाजारसोलापूरमार्केट यार्ड