Join us

शेतकऱ्याच्या अर्थकारणाला उभारी देणारा कोल्हापूर दूध व्यवसायाचा हटके पॅटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 1:40 PM

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण मजबूत करण्यात दुग्ध व्यवसायाचा मोठा हातभार लागला आहे. शेतीला सलग्न पुरक असणारा हा व्यवसाय रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच उद्योजक बनविण्यासाठीही आघाडी घेवू शकतो.

आयुब मुल्लाग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण मजबूत करण्यात दुग्ध व्यवसायाचा मोठा हातभार लागला आहे. शेतीला सलग्न पुरक असणारा हा व्यवसाय रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच उद्योजक बनविण्यासाठीही आघाडी घेवू शकतो.

विविध दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करून घरबसल्या भरघोस पैसे या व्यवसायतून मिळविता येतात. अख्ख्या कुटुंबाला कामात व्यस्त ठेवून उद्योग व्यवसायाचे केंद्र घरातच उभारता येते. कोल्हापूर जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय अफाट विस्तारला असून शेती समृध्द बनत चालली आहे. उच्च शिक्षित युवक युवती यांना शेती बरोबरच शेती सलग्न असणाऱ्या दुग्ध व्यवसायात करियर करण्याची मोठी संधी आहे.

आहारात गोडवा वाढविण्या बरोबरच सुदृढ शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या पदार्थांची मानवास गरज निर्माण झाली आहे. नेमके हेच हेरून अशा पदार्थांची उत्पादने तयार करून त्याची विक्री केले पाहिजे. आता निव्वळ डेअरीला दूध घालण्याची परंपरा पुढे नेवून चालणार नाही. तर त्याच दुधापासून पदार्थांची निर्मित करण्यास प्राधान्य द्यावे लागेल.

दुग्ध व्यवसायासाठी जिल्ह्याची भौगोलिक रचना व वातावरण खूप पोषक आहे. पशुधन तर खूप झपाट्याने वाढू लागले आहे. दुधाच्या उत्पादनात दिवसेंदिवस खूप वाढ होत चालली आहे. ग्रामीण भागातील कुटुंबात म्हैस, गाय पालन करण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. ताजा आणि हक्काचा पैसा वेळेला या व्यवसायातून मिळतो.

याला जोडूनच पशुखाद्य, खत निर्मिती हा अतिरिक्त व्यवसाय बळकटी देणारा आहे. हा व्यवसाय करणे सहज शक्य आहे. दुग्ध व्यवसाय हा शाश्वत उत्पन्न देणारा रोजगाराच्या निर्मितीचा विकासाचा मार्ग बनला आहे. यामध्ये अधिकाधिक लोकांनी आपली कौशल्ये दाखवीत आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी पाउले टाकली पाहिजेत.

पूर्वी शेतकरी दूध घाण्यासाठी घरात जास्त ठेवत असे व डेअरीला कमी घालत होता. आता उलट स्थिती निर्माण झाली आहे. डेअरीला जास्त घालतो आणि घरात कमी ठेवतो. दुधाचे बिल दहा दिवसाला मिळते त्यामुळे पैसा हातात खेळतो प्रपंचाला चांगला हातभार लागतो. ही दृष्टी सर्वसमावेशक बनत चालल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. परंपरेला छेद देण्याचे धाडस करून यातून घरच्या घरीच दुग्ध व्यवसायाचा उद्योग करावा असे व्यापक चित्र मात्र दिसत नाही. अपवादात्मक कुटुंबात ते दिसून येत आहे.

मुळातच कुटुंबातील जवळपास सर्वच पुरुष महीला शेती बरोबरच दुग्ध व्यवसायासाठी कष्ट करतात. या सर्वांनीच मनात आणले तर दुग्ध पदार्थांची निर्मिती करणे हा व्यवसाय सहज शक्य गती घेवू शकतो. घरचे दूध आणि त्यापासून उपपदार्थ बनविणे यासाठी फार काही शिक्षण, प्रशिक्षण घेतले पाहिजे असे काही नाही.

काही प्रयोग करीत तात्काळ अनुभव मिळवून देत पदार्थ बनविता येवू शकतात. त्यासाठी बाहेरील मनुष्यबळाची ही फारशी गरज भासत नाही. केवळ महत्वकांक्षी वृती बळावली पाहिजे. जिद्दीने या क्षेत्रातील उद्योजक बनून आपल्या उत्पादनांचा ब्रँड बाजारात प्रसिद्ध करणाऱ्यांचे प्रमाण हळूहळू वाढत चालले आहे.

सद्यस्थितीचा विचार करता दुग्धजन्य पदार्थांचा उपयोग दिवसभरात होतोच. तो आगामी काळात वाढतच जाणार आहे. हे पदार्थ दर्जेदार, वीना भेसळीचे मिळणे गरजेचे आहेत. यासाठी घरगुती तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांवरचा  विश्वास स्थानिक ग्राहकांचा लगेच बसू शकतो. कारण त्यांना सर्वस्थिती माहिती असते. हा विश्वास प्रचार प्रसिद्धीतून परिसरात किंबहुना जिल्ह्यात अधिक दृढ होईल. त्यातून उद्योजक होण्याचा मार्ग गतिमान होईल.

पेढे, बर्फी, पनीर, सुगंधी दूध, बासुंदी, रबडी, श्रीखंड, आम्रखंड, चीज, लस्सी, दही, ताक, तूप असे विविध उपपदार्थ दुधा पासून तयार करता येतात. घरगुती बरोबरच सार्वजनिक मोठे कार्यक्रम यामध्ये या पदार्थांचा वापर वाढलेला आहे. यापैकी कोणताही एक पदार्थ खात नाही अशी व्यक्ती सापडणार नाही.

त्यामुळे या पदार्थांना प्रचंड मागणी आहे. याचा विचार करून उत्पादन होत असलेल्या दुधावर प्रक्रिया करून यातून अधिकचे पैसे मिळविण्याचा मार्ग पकडला पाहिजे. विशेष म्हणजे रोजगार देण्याबरोबरच उद्योजक बनविणारा हा व्यवसाय स्थानिक किंबहुना घरातच आहे.

दर्जेदार पदार्थांची निर्मिती करून मार्केटिंग कौशल्याने पदार्थांचे नाव करण्यासाठी घरातीलच शिक्षित युवक युवतींनी आपले योगदान दिले तर हा व्यवसाय सोन्याहून पिवळा बनतो. अनेक कुटुंबांनी यात यश मिळविले आहे. त्यांच्या कृतिशील विचारांचा कित्ता दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी गिरवायला पाहिजे. जेणेकरून व्यापक स्वरूप या व्यवसायास प्राप्त होईल.

अशा प्रकरचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासन कमी व्याज दराने कर्ज पुरवठा करते. तसेच म्हैस, गाय घेण्यासाठी राज्य सरकारची नावीन्यपूर्ण योजना आहे. त्यातून सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना ५० टक्के व मागासवर्गीयांना ७५ टक्के अनुदानावर दोन दुधाळ जनावरे देण्याची योजना आहे. गत वर्षापासून ही योजना आली आहे. या योजनेचा लाभ घेवून दूध उत्पादन वाढविणे व त्यातून उप पदार्थ निर्मिती करीत प्रगती साध्य करणे शक्य आहे.

मानव स्पर्श विरहित काढलेल्या दूधा विक्री करून जास्तीचा दर ही मिळू शकतो. कासेला डायरेक्ट मशीन लावून ते भांड्यात काढून त्याची ग्राहकांसमोर थेट विक्री करण्याची पद्धत आहे.कोणतीही प्रक्रिया न करता दूध मिळते त्यामुळे त्याची गुणवत्ता दर्जा चांगला असतो त्यामुळे जास्त दराने त्याची विक्री होवू शकते.

कोल्हापूर आणि दुध उत्पादनाचे आकडे - कोल्हापूर जिल्ह्यात सन २०१९ च्या पशूगणनेनुसार ५ लाख ६८ हजार ८८४ (म्हैस) तर २ लाख ८३ हजार ६३७ (गाय) संख्या आहे.- गेल्या पाच वर्षात यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे त्यामध्ये सुमारे दोन लाखाहून अधिक वाढ झाल्याचे सांगण्यात येते.- जिल्ह्यात ३ लाख २५ हजार इतकी दूध उत्पादकांची संख्या आहे.- जिल्ह्यातील गावातून सुमारे १५ लाख ८२ हजार लिटर दूध प्रतिदिन संकलन होते.- बाहेरील जिल्ह्यातून ४ लाख ३८ हजार ७३२ व राज्याबाहेरून ३ लाख ४६ हजार ३७० लिटर दूध विविध दूध संघ व मोठ्या डेअरी संकलित करतात. 

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीशेतीव्यवसायदूधगायदूध पुरवठा