Join us

खरं तर यात म्हशीची काहीच चूक नव्हती, पण तिच्यामुळं झालं असं काही की...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 12:50 PM

पाळलेल्या म्हशीमुळे असा काही प्रसंग आपल्यावर ओढवेल याची कल्पनाही बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याने केली नव्हती. खरं तर या प्रकरणी म्हशीची चूक नाही पण जे झालं ते असं आहे, जाणून घ्या अधिक

दुध दुभत्यासाठी गायी म्हशी अनेक शेतकरी पाळतात. म्हशी पाळणारे गायींच्या तुलनेत तसे कमीच असतात. म्हैस पाळणाऱ्यांच्या भावनाही गाय पाळणाऱ्यापेक्षा जरा वेगळ्या असतात. म्हशीच्या दुधाला तुलनेने चांगला दर मिळत असल्याने अनेकांचे म्हशींवर जरा जास्तच प्रेम असते. अशाच एका लाडक्या म्हशीमुळे बीड जिल्ह्यातील एका कुटुंबियांवर मात्र वेगळाच प्रसंग ओढावला. खरं तर निरागस म्हशीची चूक काहीच नाही. पण चूक झालीच असेल, तर बिचारीला चरायला जावेसे वाटले ही एकच..

बीड जिल्हयातील अंबाजोगाई तालुक्यातील एका गावचे रहिवासी असलेल्या दिनकर चौरे यांनी म्हैस पाळली आहे. मात्र ही म्हैस चरण्यासाठी शेजारच्या शेतात गेली आणि भावकीत कहर झाला. भाऊबंदांनी म्हशीच्या चरण्यावरून तिच्या मालकाला जबर मारहाण करून त्याचे डोकेही फोडले. तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली.

दिनकर चंद्रसेन चौरे हे आपल्या शेतातील गोठ्यासमोर उभे राहिले असता, त्या ठिकाणी सखाराम दाजी चौरे, मधुकर सखाराम चौरे व दशरथ सखाराम चौरे या तिघांनी त्या ठिकाणी येऊन तुझी म्हैस आमच्या शेतात का आली, अशी भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करून, लाथाबुक्क्यांनी व लोखंडी गजाने मारहाण केली. यापुढे तुझे जनावरे आमच्या शेतात आले तर तुला जिवे मारीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी दिनकर चंद्रसेन चौरे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

डोके फोडले, फासाेळ्या फॅक्चर बुधवारी रात्री दिनकर चंद्रसेन चौरे आणि सखाराम दाजी चौरे यांच्यात हाणामारी झाल्यानंतर गुरुवारी माजी सरपंच महादेव चौरे व ग्रामस्थांनी बैठक घेऊन दोघांनाही समजावून सांगितले होते. परंतु गुरुवारी दुपारी १ वाजता दिनकर चौरे, दिगंबर चौरे व दीपक चौरे यांनी केलेल्या मारहाणीत सखाराम दाजी चौरे यांच्या डोक्याला दुखापत झाली असून दोन फासाेळ्या ही फॅक्चर झाल्या. यासोबतच जखमी शेषेराव दाजी चौरे, मधुकर सखाराम चौरे, दशरथ सखाराम चौरे या चौघांना गुरुवारी सायंकाळी ६ वाजता अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान घुगे यांनी दिली. म्हशीच्या कारणामुळे हा प्रसंग घडला पण त्यात म्हशीची तशी काहीच चूक नाही.

टॅग्स :गुन्हेगारीशेती क्षेत्रशेतकरी