जातिवंत गायी, म्हशी खरेदी केल्या तरीही अपेक्षित दूध देतीलच असे नाही. त्यामुळे लाखो रुपये देऊन खरेदी केलेल्या जनावराने फसवले तर शेतकऱ्याचे कुटुंब उद्ध्वस्त होते. यासाठी, खरेदी पूर्वी जनावराची डीएनए चाचणी केली तर दूध उत्पादकता किती आहे आता समजणार आहे.
गायी, म्हशी खरेदी केल्या तरीही अपेक्षित दूध देतीलच असे नाही. त्यामुळे लाखो रुपये कर्ज काढून खरेदी केलेल्या जनावराने फसवले तर शेतकऱ्याचे कुटुंब उद्ध्वस्त होते.
यासाठी, खरेदी पूर्वी संबंधित जनावराची डीएनए चाचणी केली तर त्यातून त्याची दूध उत्पादकता, म्हशींमध्ये जातिवंत असण्याची किती टक्केवारी आहे व आयुष्यमान कळाले तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते फायदेशीर ठरेल.
यावर बांगलादेशात संशोधन झाले असून, याची भारतासह श्रीलंका, थायलंड, साऊथ कोरिया येथे अंमलबजावणी करण्यासाठी नुकतीच दिल्ली येथे बैठक झाली. भारत व थायलंड देशाकडून इंडियन डेअरी असोसिएशनचे सदस्य व थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार डॉ. चेतन नरके यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.
भारतात प्रतिदिन २३० मिलियन टन दूध उत्पादन होते. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये ५.५० टक्के वाटा हा दूध व्यवसायाचा आहे. भारताला २०४८ पर्यंत ६२८ मिलियन टन दूध उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आहे.
यासाठी जातिवंत दुभती जनावरांची पैदास महत्त्वाची आहे. आपल्याकडील पिकाऊ जमीन, त्यासाठी ओल्या चाऱ्यासाठी राखीव जमीन याचा हिशोब पाहिला तर केवळ जनावरांची संख्या वाढविण्यावर मर्यादा येणार आहेत.
यासाठी दूध उत्पादकता वाढविली पाहिजे, अशा प्रकारचे संशोधन एकीकडे होणे अपेक्षित असताना दुसऱ्या बाजूला बाजारातील दुधाळ जनावरांच्या खरेदी-विक्रीकडे आपले लक्ष हवे. परराज्यातील हरयाणा, गुजरात आदी राज्यांतून जातिवंत म्हैस खरेदी करायची झाल्यास सव्वा लाख रुपये मोजावे लागतात.
मात्र, ही म्हैस आपल्या गोठ्यात आल्यानंतर वातावरणात बदल होतो, पशुखाद्य बदलते आणि अपेक्षित दूध मिळत नाही. जर अपेक्षित दूध मिळाले नाही, तर शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होतात. किमान म्हशीच्या पहिल्या वेतात ५० टक्के तरी कर्जाची परतफेड होणे अपेक्षित असते.
दुसरीकडे भाकडकाळ वाढला तर कर्जाच्या व्याजातच शेतकऱ्याला पिसावे लागते. यासाठी म्हैस खरेदी करतानाच ती किती दूध देऊ शकेल, तिचे आयुष्यमान किती आहे, हे जर अगोदरच शेतकऱ्याला समजले, तरत्याची खरेदी करताना फसवणूक होणार नाही.
७३ मिलियन टन म्हशीचे दूध फक्त भारतात
- भारतात म्हशी व गायींचे प्रतिदिनी २३० मिलियन टन दूध उत्पादन असते. त्यापैकी केवळ ३२ टक्केच, म्हणजेच ७३ मिलियन टन म्हशींचे उत्पादन आहे.
- हे उत्पादन वाढवायचे झाल्यास शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत नवतंत्रज्ञान घेऊन जाण्याची गरज आहे.
न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात व्यवसाय घटला
जगात दूध उत्पादनात ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड अग्रस्थानी राहतो. मात्र, ग्रीन गॅस' उत्सर्जनाची समस्या डोके वर काढू लागली आहे. त्याचा थेट परिणाम ग्लोबल वॉर्मिंगवर होत असल्याने त्यांनी दूध व्यवसाय थोडा कमी केला आहे. त्यामुळे आपणाला हा व्यवसाय वाढविण्याची संधी आहे.
चेतन नरके घेणार लवकरच केंद्रीय पशुसंवर्धन मंत्र्यांची भेट
बांगलादेशाचे संशोधन भारतात आणावे, यासाठी डॉ. चेतन नरके हे लवकरच केंद्रीय दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंग यांची भेट घेणार आहेत.
आपल्या देशातील दुधाची मागणी आणि उत्पादन हे आता जरी समप्रमाणात असले तरी भविष्यात लोकसंख्येची होणारी वाढ आणि दुधाचे उत्पादन हे प्रमाण निश्चितच व्यस्त राहणार आहे. आतापासूनच आपण त्याकडे बघितले पाहिजे. यासाठी गेल्या आठवड्यात श्रीलंका, बांगलादेश, भारत, थायलंड आणि साऊथ कोरिया देशांच्या प्रतिनिधींची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक झाली, यामध्ये माझ्या शेणा-मूत्रात राबणाऱ्या दूध उत्पादकांची होणारी फसवणूक थांबावी व म्हैस खरेदी पूर्वीच त्याला जर तिची उत्पादक व तिला असणारा आजार आणि त्यातून तिचे आयुष्यमान समजले तर अधिक चांगले होईल. डीएनए चाचणीच्या माध्यमातून हे सगळे समजणार असेल तर ते संशोधन भारतात आले पाहिजे, याबाबत लवकरच केंद्रीय पशुसंवर्धन मंत्र्यांची भेट घेणार आहे. - डॉ. चेतन नरके (सदस्य, इंडियन डेअरी असोसिएशन, नवी दिल्ली)
- राजाराम लोंढे
वरिष्ठ बातमीदार, कोल्हापूर