गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli District) धान पिकाबरोबर इतरही भाजीपाला पिकांची शेती करण्यावर भर दिला जात आहे. जिल्ह्यातील जोगीसाखरा परिसरातील शेतकरी दरवर्षी कारले पिकांची लागवड (Karle Lagvad) करतात. गेल्या दोन ते तीन वर्षापासून या भागात कारले पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे व्यापारी थेट ग्रामीण भागात जाऊन कारले नेत आहेत.
जिल्ह्यातील पाथरगोटा परिसरात यंदा कारल्याचे उत्पादन (Bitter Guard Production) चांगले झाले असून, शहरातील व्यापारी थेट शेताच्या बांधावरून कारले बाजारपेठेत घेऊन जात आहेत. आरमोरी तालुक्याच्या पाथरगोटा, शंकरनगर, पळसगाव व रामपूर येथील शेतकरी आपल्या जमिनीच्या उत्पादन क्षमतेचा विचार करून व रोजचे नगदीचे पीक म्हणून कारले पिकाला पसंती देत आहेत.
५०० वर क्विंटल कारलीचे उत्पादन
या भागातील पाच ते सहा गावांमध्ये मिळून होते. जसे उत्पादन वाढले तसे व्यापारी वाढले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कारल्याची खरेदी केली जात आहे. तसेच पाथरगोटा परिसरातील कारली नागपूरवरून मुंबई, रायपूर तसेच छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांतील मोठ्या शहरात पुरवठा केला जात आहे. नगदी पिके घेऊन या भागातील शेतकरी आपली आर्थिक बाजू बळकट करत आहेत.
शेतातच काटा, खर्चाची बचत
मागणी वाढल्यामुळे कारले उत्पादकांना आता आपल्या मालाचे भाव थोडे कायम ठेवण्याची संधी मिळाली आहे. ३५ ते ४० रुपये किलो भावाने कारलीचा शेतामध्येच काटा केला जात आहे. बाजार मंडीत जाऊन तासन् तास ताटकळत बसणे सध्यातरी थांबले व वाहतूक खर्च वाचला आहे. व्यापारी शेतात येत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.